छत्रपती संभाजीनगर : कुटुंबीयांसह बहिणीला भेटण्यासाठी कोल्हापूर येथे गेलेल्या व्यावसायिकाचे घर फोडून चोरट्याने सुमारे ८ तोळे सोन्याचे दागिने, ७४ ग्रॅम चांदी, साडेतीन लाखांची रोख असा लाखोंचा ऐवज लंपास केला. ही घटना ३ ते ७ जानेवारीदरम्यान न्यू हनुमाननगर भागात घडली. दरम्यान, पोलिसांनी सराईत चोरट्याला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक केली आहे. संदेश ऊर्फ चिंग्या गणेश खडके (२०, रा. भारतनगर, गारखेडा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
सचिन सोमनाथ नवले (२६, रा. न्यू हनुमाननगर) यांचा फोटो फ्रेमचे दुकान आहे. ३ जानेवारी रोजी कुटुंबासह बहिणीला भेटण्यासाठी कोल्हापूरला गेले होते. ७ जानेवारी रोजी पहाटे ३:०३ च्या सुमारास चोरट्याने सचिन यांच्या घराचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील ३२ ग्रॅमची सोन्याची चैन, १८ ग्रॅमचा हार, १ तोळ्याचे मिनी गंठण, १ तोळ्याच्या सोन्याच्या दोन अंगठ्या आणि लहान मुलांच्या अंगठ्या, चांदीचे दागिने, साडेतीन लाखांची रोकड, असा ऐवज चोरीला गेल्याचे समोर आले.
पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अशोक भंडारी आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. परिसरातील स्मार्ट सिटीचे कॅमेरे आणि खासगी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. गुप्त बातमीदाराकडून पोलिसांनी भारतनगर परिसरातून संदेश ऊर्फ चिंग्या याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून केवळ ३२ ग्रॅमची सोनसाखळी जप्त करण्यात आली आहे. त्याच्या अन्य साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. ही कारवाई एपीआय विनोद भालेराव, रेशीम कोळेकर, सुनील धुळे, विनोद गायकवाड, संदीप बीडकर, अजय कांबळे, प्रशांत नरोडे आणि अंकुश वाघ यांनी केली.
सहा महिन्यांपूवीच एकाला भोसकले
पुंडलिकनगर भागातील एका गुन्हेगाराच्या टोळीचा संदेश ऊर्फ चिंग्या खडके हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूवी तब्बल १६ गुन्हे दाखल आहेत. मे २०२५ मध्ये त्याने दारूसाठी १०० रुपये देण्यास नकार देणाऱ्या मजुराला साथीदारांसह भोसकले होते.