छत्रपती संभाजीनगर : निजामासह औरंगजेबाने ज्या सध्याच्या छत्रपती संभाजीनगर तर तत्कालीन औरंगाबादेतून राज्यकारभार चालवला, त्या शहराच्या वैभवशाली इतिहासाच्या अनेक खुणा आजही पहायला मिळतात. त्यापैकी सोनेरी महल, जनाना महल आणि नवखंडा महल हे शहराच्या ऐतिहासिक वारशातील महत्त्वाचे दुवे आहेत. मात्र, या तीन महलांपैकी सोनेरी महल वगळता उर्वरित दोन्ही वास्तूंची अवस्था भग्नावस्थेत आहेत. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या वास्तूंचे संवर्धन झाले, तर इतिहास जपण्यासोबतच पर्यटनालाही नवी दिशा मिळू शकेल.
औरंगजेबाच्या दक्षिणेतील प्रदीर्घ वास्तव्यासह निजामाच्या काळातही औरंगाबादला प्रशासकीय आणि राजकीय महत्त्व प्राप्त झाले होते. त्यामुळे शहरातील तत्कालीन वास्तू केवळ दगड-मातीच्या इमारती नसून त्या काळातील राजकीय, सामाजिक आणि स्थापत्य इतिहासाच्या साक्षीदार आहेत. जनांना महल आणि नवखंडा महल या वास्तूही त्याच ऐतिहासिक वारशाचा भाग आहेत. मात्र, काळाच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्याने या वास्तूंचे मूळ वैभव लोप पावत आहे.
काही ठिकाणी केवळ भग्नावशेष उरले असून, पुढील पिढीला या वास्तूंचे महत्त्व समजावे यासाठी ठोस प्रयत्नांची गरज आहे. शहरातील महल, ऐतिहासिक दरवाजे, पाण्याच्या पारंपरिक व्यवस्था, किल्लेबंदी आणि इतर ऐतिहासिक वास्तूंना जोडून हेरिटेज सर्किट विकसित करता येईल. पर्यटकांना केवळ प्रसिद्ध वास्तू दाखविण्याऐवजी शहराचा संपूर्ण मध्ययुगीन इतिहास अनुभवता येईल.
पर्यटन दिनानिमित्त वारसा संवर्धनाचा संकल्प
जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरच्या ऐतिहासिक वारशाकडे नव्याने पाहण्याची गरज आहे. जनांना महल आणि नवखंडा महल केवळ भग्न वास्तू न राहता भविष्यातील पर्यटनस्थळे बनू शकतात. त्यासाठी पुरातत्त्व विभाग, पर्यटन विभाग, महापालिका आणि इतिहास अभ्यासक यांनी एकत्रितपणे संवर्धनाचा आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे.
विद्यापीठातील पर्यटन विभागात वारसा संवर्धन लॅब आहे. या लॅबमध्ये जनाना महलाच्या जागेवरील दगड, माती व इतर वस्तुंचे शास्त्रशुद्ध परीक्षण करून त्याचा अहवाल दिला आहे. संवर्धन करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याची माहिती अहवाल दिली असल्याची माहिती डॉ. राजेश रगडे यांनी दिली.
सोनेरी महलाचा आदर्श का घेऊ नये
सोनेरी महलाला ज्या पद्धतीने ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळ म्हणून ओळख मिळाली, त्याच धर्तीवर जनांना महल आणि नवखंडा महल यांचेही संवर्धन करता येऊ शकते. वास्तूंच्या मूळ रचनेला धक्का न लावता शास्त्रोक्त पद्धतीने दुरुस्ती, संरचनात्मक मजबुतीकरण, परिसर स्वच्छता, प्रकाशयोजना, सुरक्षा आणि माहितीफलक उभारण्याची गरज आहे. प्रत्येक महलाचा इतिहास, स्थापत्यशैली आणि तत्कालीन संदर्भ पर्यटकांना समजावा यासाठी क्यूआर कोड, ऑडिओ गाइड आणि बहुभाषिक माहितीफलक उभारता येतील.