छत्रपती संभाजीनगर : दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने उन्हाचा पारा वाढत आहे. त्यामुळे सर्वच पर्यटनस्थळांवर पर्यटकांचा शुकशुकाट दिसून येत आहे. सर्वात जास्त पसंतीत असलेल्या बीबी का मकबऱ्याकडेही गेल्या आठ दिवसांपासून पर्यटकांनी पाठ फिरवल्याने त्या ठिकाणीही शुकशुकाट दिसून आला.
बीबी का मकबरा, पाणी चक्की, दौलताबाद किल्ला, वेरूळ लेणी तसेच अजिंठा लेणीच्या पर्यटनासाठी देश विदेशातून पर्यटक येत असतात. मार्च-एप्रिलपर्यंत पर्यटकांची संख्या मोठी असते. दरम्यान या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाचे चटके बसायला लागल्याने पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात रोडावली आहे. मार्च प्रमाणेच एप्रिल महिन्यांतही शुकशुकाट दिसून आला. मे महिन्यांत उन्हाचा पारा आणखी वाढला असल्याने पर्यटकांनी याकडे पाठ फिरवत थंड हवेच्या ठिकाणांकडे मोर्चा वळवला आहे.
पर्यटकांत भीतीचे वातावरण
अजिंठा लेणीत वारंवार होणारा मधमाशांचा हल्ला आणि पुरातत्त्व विभागाची उदासीनता पाहता पर्यटकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. गतवर्षीही अजिंठा लेणीत मधमाशांचा हल्ला आणि दौलताबाद किल्ल्यात पेटलेला वणवा यामुळे पर्यटकांची संख्या घटली होती. यातून पुरातत्त्व विभागाने काहीच धडा घेतला नसून, अद्यापही याबाबत काहीच उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करत आहेत.
व्यवसायांवर परिणाम
पर्यटनस्थळांवर विविध व्यावसायिक व्यवसाय थाटून बसलेले आहेत. त्यांचा व्यवसाय पूर्णपणे पर्यटकांवर अवलंबून आहे. एप्रिल अखेरपर्यंत पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांचा व्यवसायही जोरात असतो. मात्र यावर्षी चित्र उलटे दिसून येत आहे. मार्चपासूचन व्यवसायाला घरघर लागली आहे.