पडेगाव भागात रात्री सुरू असलेल्या कचरा संकलन करणारे वाहन व गोळा केलेले गवत. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Garbage Collection Scam : वजन वाढवण्यासाठी कचऱ्याची हेराफेरी ?

मिटमिटा-पडेगाव रस्त्यावर वाहनांत माती, गवत भरण्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : कचरा संकलनाच्या वाहनांचे वजन वाढवून महापालिकेची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक गणेश लोखंडे यांनी केला आहे. प्रभाग क्रमांक चारमधील मिटमिटा ते पडेगाव रस्त्यावर रात्रीच्या कचरा संकलनादरम्यान वाहनांमध्ये माती आणि गवत भरले जात असल्याचा प्रकार उघडकीस आणल्याचा त्यांनी दावा केला. याप्रकरणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार करून संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली आहे.

महापालिकेने रात्रीच्या वेळी कचरा संकलनास मनाई केली आहे. मात्र संबंधित भागात रात्री वाहनांद्वारे कचरा उचलला जात असल्याची तक्रार नगरसेवक गणेश लोखंडे यांनी महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्याकडे केली. तसेच त्यांनी घटनास्थळी जाऊन संकलन थांबविले. कचऱ्याबरोबर माती व गवत वाहनांत टाकून वजन वाढविण्याचा प्रकार प्रत्यक्ष पाहिल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

यामुळे कचऱ्याच्या वजनात कृत्रिम वाढ दाखवून कंत्राटदार महापालिकेची दिशाभूल करीत असल्याचा त्यांचा आरोप आहे. तसेच कचरा संकलनाच्या कामातील अटी व नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यापूर्वीही संबंधित कंत्राटदारांविरोधात कारवाई झाल्याची माहिती प्रसिद्ध झाली होती. मात्र, त्यानंतरही असे प्रकार सरर्स सुरू असल्याने कारवाईचा धाक उरला नसल्याचे त्यांनी नमूद केले. संकलन प्रक्रियेवर नियमित देखरेख ठेवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

यासह वाहनांच्या जीपीएस नोंदी तपासून रात्रीच्या फेऱ्यांची पडताळणी करावी. नियमभंग करणाऱ्या कंत्राटदारासह संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. वाहनांची नियमित तपासणी करावी. नियम मोडणारी वाहने महापालिका हद्दीबाहेर जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. कंत्राटदारांना अनुचित आर्थिक लाभ मिळवून देणाऱ्या बाबींनाही आळा घालावा, दोषींना पाठीशी न घालता जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

कचरा संकलनासाठी येणाऱ्या वाहनांमध्ये प्रत्यक्ष कचऱ्याबरोबर माती आणि गवत भरून वजन वाढविले जात असल्याचा आरोप आहे. अशा प्रकारामुळे संकलित कचऱ्याचे वजन अधिक दाखविले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनांतील कचऱ्याची प्रत्यक्ष तपासणी आणि वजनाची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT