गंगापूर : व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून रोकड लुटणाऱ्या तिन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केलेल्या मुद्देमालासह अटक केली Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Robbery | व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून रोकड लंपास करणाऱ्या तिघांना अटक

एकाने सोनवणे यांच्या तोंडावर मिरची पावडर फेकली, तर इतर दोघांनी त्यांच्या ट्राउझरच्या खिशातून जीपची चावी बळजबरीने काढून घेतली

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar Cash Robbery Case

गंगापूर : व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून बोलेरो जीपमधील १ लाख ५५ हजार रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या त्रिकुटाला स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीची काही रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण १ लाख ४१ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विकास भाऊसाहेब काकडे (वय २०, रा. भालगाव, ता. गंगापूर), अजिम रज्जाक शहा (वय १९, रा. भालगाव, ता. गंगापूर) आणि समाधान सुदाम ठोकळ (रा. धोंदलगाव, ता. वैजापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

नेमकी घटना काय?

मुददेश वडगाव (ता. गंगापूर) येथील व्यापारी शंकर कारभारी सोनवणे (वय ६५) हे १६ नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास आपल्या बोलेरो जीपमधून जात होते. यावेळी विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांना गाठले. एकाने सोनवणे यांच्या तोंडावर मिरची पावडर फेकली, तर इतर दोघांनी त्यांच्या ट्राउझरच्या खिशातून जीपची चावी बळजबरीने काढून घेतली. त्यानंतर जीपच्या पुढील सीटवर ठेवलेली १ लाख ५५ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन चोरटे पसार झाले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

असा लागला छडा

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना तपासाचे आदेश दिले. पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास चक्र फिरवली असता, भालगाव येथील विकास काकडे हा गुन्हा घडल्यापासून मोबाईल बंद करून फरार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याचा माग काढत प्रवरासंगम (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) येथे नातेवाईकांकडे लपून बसलेल्या विकासला ताब्यात घेतले.

पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार पथकाने भालगाव येथून अजिम शहा आणि धोंदलगाव येथून समाधान ठोकळ या दोघांनाही बेड्या ठोकल्या. अटक केलेल्या तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी गंगापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

या पथकाने केली कारवाई

ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. विजयसिंग राजपूत, सपोनि वैभव रणखांब, पोलीस अंमलदार विष्णू गायकवाड, भागीनाथ आहेर, शिवानंद बनगे, अशोक वाघ, अनिल काळे तसेच तांत्रिक विभागाचे योगेश तरमाळे आणि जीवन घोलप यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT