Crime News pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : फळविक्रेत्यांवर गुन्हेगारांच्या टोळीचा जीवघेणा हल्ला

मध्यस्थीला आलेल्या तरुणालाही भोसकले

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : फळविक्रीची हातगाडी लावण्यावरून झालेल्या वादाची पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून, सराईत गुन्हेगारांच्या टोळीने दोन फळविक्रेत्या भावांवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. यावेळी एकाला वाचवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या दुसऱ्या तरुणाच्या बरगडीत चाकू भोसकून त्याला गंभीर जखमी केले.

ही घटना बुधवारी (दि. ३०) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जटवाडा रोडवरील एकतानगर भागात घडली. याप्रकरणी हर्मूल पोलिस ठाण्यात चौघांवर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश ऊर्फ भावड्या प्रभाकर जिरे (२०, रा. एकतानगर), घनशाम ऊर्फ गणू बंडू खरात (२०, हर्मूल जेलच्या मागे), चेतन किशोर चौधरी (२०, रा. जहांगीर कॉलनी) आणि उस्मान हमीद खान (२१, रा. एकतानगर) अशी आरोपींची नावे असून चौघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक स्वाती केदार यांनी दिली.

फिर्यादी रहमान सुलतान पठाण (२६, रा. सावंगी, हसूल) याच्या तक्रारीनुसार, तो आणि त्याचा भाऊ सलमान हे फळविक्री करून उदरनिर्वाह करतात. बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ते जटवाडा रोडवरील एकतानगर भागात हातगाडीवर फळे विकत होते. त्यावेळी आरोपी योगेश, घनशाम आणि योगेशचे वडील तिथे आले आणि आजपासून येथे हातगाडी लावायची नाही असे म्हणत शिवीगाळ व मारहाण केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकाराबाबत सलमानने बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

आपल्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिल्याचा राग आरोपींच्या मनात होता. रात्री साडेसात वाजेच्या सुमारास रहमान हा त्याची हातगाडी बंद करून त्याचा भाऊ राहत असलेल्या जहांगीर कॉलनीकडे जात होता. त्यावेळी कुलसूम मेडिकलसमोर आरोपी योगेश, घनशाम, चेतन आणि उस्मान या चौघांनी त्याला अडवले.

तक्रारीचा राग अन् थेट चाकू हल्ला

तुम्ही आमच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार का केली? असे म्हणत आरोपींनी मारहाण सुरू केली. त्यावेळी तिथे रहमान आणि त्याच्या नात्यातील फैसल पठाण असे दोघेच होते. आरोपी घनशामने चाकू काढून रहमानच्या डाव्या दंडावर वार करून त्याला जखमी केले. रहमानच्या दंडातून रक्त वाहत असल्याने फैसल त्याला सोडवण्यासाठी आणि उचलण्यासाठी मध्ये पडला. फैसल खाली वाकलेला असताना, आरोपी घनशामने त्याच्या पाठीवर बरगडीत चाकू भोसकून त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्यानंतर चौघेही पळून गेले. या गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक अर्जुन दांडेगावकर हे करत आहेत.

आरोपी सराईत गुन्हेगार

चारही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर हसूल, बेगमपुरा पोलिस ठाण्यात हाणामारी, चोरीसह अन्य काही गंभीर गुन्हे दाखल आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT