

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा हद्दीत समृद्धी महामार्गावर चॅनेल नं. ४११ जवळ एका अनोळखी अंदाजे ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा मृत्यू अपघातामुळे झाला आहे की घातपातातून, असा प्रश्न आता उपस्थित झाला असून चिकलठाणा पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजेच्या सुमारास महामार्ग पोलिसांचे पथक मनोहर पाटील, कृष्णा घंटे आणि एचएसपी हेड कॉन्स्टेबल गरड हे गस्त घालत असताना, समृद्धी महामार्गाच्या नागपूर कॉरिडॉरवरील चॅनेल नंबर ४११ येथे क्रॅश बॅरिअरजवळ त्यांना एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.
तत्काळ या घटनेची माहिती समृद्धी कंट्रोल रूमला आणि चिकलठाणा पोलिसांना दिली. माहिती मिळताच चिकलठाणा पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र बनसोडे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेत घाटीत नेला.
सायंकाळपर्यंत या व्यक्तीची ओळख पटलेली नव्हती. मृतदेहावर कोणत्या जखमांच्या खुणा आहेत का, या व्यक्तीचा मृत्यू नेमका कुठे आणि कशामुळे झाला, तसेच हा अपघात आहे की खून करून मृतदेह येथे आणून टाकला, या सर्व अंगांनी पोलिसांकडून तपास केला जात आहे.
या व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे नेमके कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल. मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय महामार्गावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची देखील तपासणी केली जात आहे.
राजेंद्र बनसोडे, पोलिस निरीक्षक, चिकलठाणा