छत्रपती संभाजीनगर : कौटुंबिक वादातून पत्नी आणि सासरच्या मंडळींना अपहरणाच्या गुन्ह्यात अडकवून अद्दल घडविण्यासाठी वडिलांनीच दोन वर्षाच्या मुलीच्या अपहरणाचा बनाव केल्याचा धक्कादायक प्रकार राहळपट्टी तांडा (हसूल) येथे उघडकीस आला. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार मिळताच पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबवली.
तब्बल १६ तासांनंतर चिमुकली घराच्या पाठीमागील शेतातील एका घरात सुखरूप आढळली. श्वान पथकाचा कौल आणि मुलीच्या चेहऱ्यावर दिसून आलेला टवटवीतपणा यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतरच्या चौकशीत वडील आणि आजीनेच हा बनाव केल्याचे समोर आले.
राहळपट्टी तांडा येथील दाम्पत्यात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू आहेत. हे प्रकरण भरोसा सेलमध्ये प्रलंबित असून, दोन दिवसांनी त्याची तारीख होती. चिमुकली आईजवळ न राहता वडिलांकडे होती. पंधरा दिवसांपूर्वी आईने मुलीला माहेरी नेण्याचा प्रयत्न केला होता. याच रागातून पत्नी आणि सासरच्यांना अपहरणाच्या गुन्ह्यात गोवण्याचा कट रचण्यात आला.
४ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चिमुकली घरात आत्यासोबत होती. आत्या घराच्या मागील हौदावर कपडे धुण्यासाठी गेल्याची संधी साधून मुलगी ओट्यावरून गायब झाल्याचा बनाव करण्यात आला. त्यानंतर वडिलांनी सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पत्नीच्या माहेरी फोन करून मुलगी तिकडे आली आहे का, अशी विचारणा केली.
नंतर हसूल पोलिस ठाण्यात धाव घेत तिचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. दोन वर्षांची चिमुकली बेपत्ता झाल्याने पोलिस यंत्रणा तातडीने कामाला लागली. गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्यासह चार पथक, आणि हर्सल ठाण्याच्या निरीक्षक स्वाती केदार यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटाही घटनास्थळी दाखल झाला.
सुमारे १५० पोलिस कर्मचारी आणि ग्रामस्थांनी ऊसाची शेते तसेच आजूबाजूचा परिसर रात्रभर पिंजून काढला. अपहरणाचा माग काढण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, श्वान इतरत्र न जाता चिमुकलीच्या वडिलांच्या परिसरात आणि घराजवळच घुटमळत राहिले. त्यामुळे अपहरणाच्या कथनाबाबत पोलिसांना संशय आला. घरातील व्यक्तीच या प्रकारामागे असण्याची शक्यता तपासात पुढे आली.
रात्रभर गायब, तरी चेहऱ्यावर भीती नाही
शनिवारी सकाळी ९.३५ वाजता घराच्या पाठीमागील शेतातील एका घरात चिमुकली सुखरूप सापडली. रात्रभर बेपत्ता असूनही तिच्या चेहऱ्यावर भीती, रडण्याच्या खुणा किंवा थकवा नव्हता. ती शांत आणि टवटवीत दिसत होती. त्यामुळे तिला कुणीतरी जाणीवपूर्वक सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवल्याचा पोलिसांचा संशय आणखी बळावला.
पोलिसी खाक्या दाखवताच कबुली
पोलिसी खाक्या दाखवताच पत्नी आणि सासरच्या मंडळींना अडचणीत आणण्यासाठी मुलीला शेतातील घरात लपवून ठेवल्याची कबुली दोघांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. कौटुंबिक वादाचा राग काढण्यासाठी चिमुकलीचा वापर करून पोलिस यंत्रणेलाही रात्रभर वेठीस धरण्यात आले. याप्रकरणी संबंधित कुटुंबीयांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.