Farmers Online Fertilizer Demand  AI Image
छत्रपती संभाजीनगर

FSAS App Fertilizer Booking | एफएसएएस ॲपवर खत मागणी नोंदणी अनिवार्य; शेतकऱ्यांनी 'अशी' प्रक्रिया पूर्ण करावी

तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ ॲप डाउनलोड करून आपल्या पिकानुसार खतांची मागणी नोंदवावी,

पुढारी वृत्तसेवा

Farmers Online Fertilizer Demand

सिल्लोड : खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनुदानित खतांचा पुरवठा वेळेत व नियोजनबद्ध पद्धतीने उपलब्ध व्हावा, यासाठी कृषी विभागाने एफएसएएस (FSAS) ॲपद्वारे खत मागणी नोंदविणे बंधनकारक केले आहे. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ ॲप डाउनलोड करून आपल्या पिकानुसार खतांची मागणी नोंदवावी, असे आवाहन पंचायत समिती सिल्लोडच्या सभापती अनिता बनकर व गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी केले आहे.

या प्रक्रियेनुसार शेतकऱ्यांनी एफएसएएस ॲपमध्ये आधार क्रमांक व फार्मर आयडी नोंदविल्यानंतर त्यांच्या जमिनीचा तपशील उपलब्ध होतो. त्यानंतर पिकांची नोंदणी करून आवश्यक खतांची मात्रा नमूद करावी लागते. पुढे खते कोणत्या अधिकृत किरकोळ विक्रेत्याकडून खरेदी करायची आहेत, याची माहिती भरल्यानंतर संबंधित मागणीसाठी क्यूआर कोड तयार होतो. खत खरेदी करताना हा क्यूआर कोड विक्रेत्याला दाखविणे आवश्यक राहणार आहे.

शेतकरी स्वतः खरेदी करणार की प्रतिनिधीमार्फत, याची माहितीही नोंदवावी लागणार आहे. विविध प्रकारची खते वेगवेगळ्या दुकानांतून घेण्याची आवश्यकता असल्यास त्यासाठी स्वतंत्र क्यूआर कोड उपलब्ध होणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मिळालेला क्यूआर कोड मोबाईलच्या गॅलरीत सेव्ह करून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे, जेणेकरून नेटवर्क नसतानाही खत खरेदी प्रक्रियेत अडचण येणार नाही.

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी नियोजनबद्ध व्यवस्था : अनिता बनकर

सभापती अनिता बनकर यांनी सांगितले की, खरीप हंगामात खतांची उपलब्धता सुरळीत राहावी, शेतकऱ्यांना वेळेवर आवश्यक खत मिळावे आणि अनावश्यक गैरसोय टळावी यासाठी शासनाने ही डिजिटल व्यवस्था सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता आगाऊ नोंदणी करून खत नियोजनात सहकार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले.

अडचणी असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधा : रत्नाकर पगार

गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी शेतकऱ्यांना उद्देशून केलेल्या आवाहनात म्हटले आहे की, एफएसएएस ॲपवरील नोंदणी ही केवळ औपचारिकता नसून खत वितरण अधिक पारदर्शक, अचूक आणि शेतकरीकेंद्रित करण्यासाठीचा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याने स्वतःची मागणी वेळेत नोंदवून ठेवावी. ॲप वापरताना किंवा नोंदणी प्रक्रियेत कोणतीही अडचण आल्यास कृषी विभाग, पंचायत समिती सिल्लोड अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कृषी विभागाच्या या नव्या व्यवस्थेमुळे खत वितरणात शिस्त, पारदर्शकता आणि वेळेवर उपलब्धता सुनिश्चित होण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT