ई-वाहनांकडे कल वाढला : ३५ हजारांपेक्षाही जास्त वाहने रस्त्यावर pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar EV growth : ई-वाहनांकडे कल वाढला : ३५ हजारांपेक्षाही जास्त वाहने रस्त्यावर

३० हजार दुचाकी, चारचाकींचीही संख्या वाढली

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) संख्या झपाट्याने वाढत असून, ती आता ३५ हजारांच्या पुढे गेली आहे. यात दुचाकींचा सहभाग जास्त असून, सुमारे ३० हजारांपेक्षाही जास्त दुचाकी रस्त्यावर धावत आहेत, तर चारचाकींचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इंधन दरवाढ, पर्यावरण संरक्षणाबाबतची जागरूकता यामुळे नागरिकांचा ई- वाहनांकडे कल वाढला आहे.

गेल्या वर्षभरात आरटीओ कार्यालयात नोंदणी केलेल्या ई-वाहनांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास यात तब्बल ३०,१९९ ई-दुचाकी रस्त्यावर आहेत. त्यानंतर चारचाकी वाहनांची संख्या १,९०२ इतकी आहे. याशिवाय, प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या तीन चाकी पॅसेंजर वाहनांची संख्या १,९१४ तर मालवाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या तीन चाकी वाहनांची संख्या ४१३ आहे. विशेष म्हणजे, छोट्या व्यावसायिकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या ई-रिक्षा आणि ई-कार्ट यांची संख्याही वाढत आहे. जिल्ह्यात सध्या ८० ई-रिक्षा आणि ४६२ ई-कार्ट कार्यरत आहेत. यामुळे स्थानिक रोजगारनिर्मितीलाही चालना मिळत असल्याचे जाणकार सांगतात.

पर्यावरणपूरक वाहतुकीकडे कल

इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढल्याने वायू प्रदूषणात घट होण्यास मदत होत आहे. पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी करून स्वच्छ आणि हरित ऊर्जा वापराला प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे भविष्यात ई-वाहनांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चार्जिंग सुविधांची गरज

जिल्ह्यात ई-वाहनांची संख्या वाढत असली, तरी सार्वजनिक चार्जिंग स्टेशनची संख्या अद्याप अपुरी असल्याचे वाहनधारकांचे मत आहे. त्यामुळे शासन आणि स्थानिक प्रशासनाने चार्जिंग पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर देण्याची गरज असल्याचे मत वाहनधारकांनी व्यक्त केले.

आणखी वाढ होण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर जिल्हा इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरात वेगाने पुढे जात असून, पर्यावरण-पूरक आणि किफायतशीर वाहतुकीच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास येत्या काळात ई-वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता वितरकांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT