

Sambhajinagar's Rapid Strides in the State's Economic Survey
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये छत्रपती संभाजीनगर हे एक महत्त्वाचे आर्थिक विकास केंद्र म्हणून वेगाने पुढे येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. औद्योगिकीकरण, एमएसएमई क्षेत्राचा विस्तार आणि मजबूत पायाभूत सुविधा यामुळे शहर व जिल्हा आर्थिकदृष्ट्या झपाट्याने प्रगती करत असल्याचे अधोरेखित झाले आहे.
जिल्ह्याचे एकूण उत्पन्न (जीडीडीपी)
२०२१-२२ मध्ये ८६,१०० कोटी होते. ते २०२४-२५ मध्ये १,३३,१०५ कोटींवर (५४.६ टक्के वाढ), तर वार्षिक सरासरी वाढदर (सीएज-ीआर) सुमारे १५-१६ टक्के) पोहोचला आहे. शहराचे प्रतिव्यक्ती उत्पन्न २.७९ लाख तर जिल्ह्याचे २.४० लाख इतके नोंदवले गेले आहे. संभाजीनगर विभागाचे एकूण उत्पादन ५ लाख कोटींच्या पुढे गेले आहे. औद्योगिक क्षेत्रात जिल्ह्यात ९,४२९ युनिट्स कार्यरत असून ऑटो, अभियांत्रिकी, फार्मा व उत्पादन क्षेत्रात सुमारे २.६१ लाख रोजगार निर्माण झाले आहेत. एमएसएमई क्षेत्रात ८.०२ लाख सूक्ष्म, ८,२८८ लघु आणि २.०६४ मध्यम उद्योग कार्यरत असून या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत आहे.
येथील इंडस्ट्रियल ऑरिक सिटी हा १० हजार एकरांवरील स्मार्ट औद्योगिक प्रकल्प असून आतापर्यंत ९१,७२९ कोटींची गुंतवणूक आकर्षित झाली आहे. या प्रकल्पातून ५४ हजारांहून अधिक थेट रोजगारनिर्मितीची क्षमता आहे.
शहराची प्रगती आणखी वेगाने
या पार्श्वभूमीवर, छत्रपती संभाजीनगर फर्स्टचे अध्यक्ष रितेश मिश्रा म्हणाले, येथील ऑरिक, डीएमआयसी आणि मजबूत औद्योगिक पायावर आधारित राज्यातील पुढील मोठे उत्पादन व गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येत आहे. योग्य धोरणात्मक नियोजन आणि पायाभूत सुविधा यामुळे शहराची प्रगती आणखी वेगाने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.