छत्रपती संभाजीनगर : पैठणगेट परिसरात अंडाभुर्जीच्या गाडीवर किरकोळ वादातून झालेल्या तरुणाच्या खुनानंतर परिसरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मनपाकडून मुकुंदवाडी प्रमाणेच पैठणगेट परिसरातही पाडपाडीची मोहीम हाती घेण्यात आली असून, बुधवारी (दि.१९) सकाळी १० वाजेपासून या भागातील तीन मार्गावरील अतिक्रमणावर हातोडा चालवला जाणार आहे.
मनपा नगररचना विभागाच्या वतीने या भागात मार्किंग करून ८५ मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आली असून, अतिक्रमण विभागप्रमुख संतोष वाहुळे यांनी या भागाची मंगळवारी (दि.१८) पाहणी करून मालमत्ताधारकांना साहित्य काढून घेण्याची सूचना केली. तसेच ध्वनिक्षेपकावरून आवाहनही करण्यात आले आहे. त्यानुसार पैठणगेट परिसरातील अतिक्रमणावर आजपासून कारवाई सुरू केली जाणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागप्रमुख संतोष वाहुळे यांनी दिली.
क्षुल्लक कारणावरून पैठणगेट परिसरात तरुणाचा खून झाल्यानंतर या भागातील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला. या घटनेनंतर कुरेशी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयासमोर ठिय्या देत अनधिकृत दुकानांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर महापालिकेने संबंधित दोन दुकानांवर नोटीस चिकटवली. दरम्यान, प्रशासक जी. श्रीकांत यांनी संपूर्ण परिसरातील अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे नगररचना विभागाचे नगररचनाकार राहुल मालखेडे यांनी दोन दिवसांत टोटल स्टेशन सर्व्हे करून मालमत्तांवर मार्किंग केली. यात पैठणगेट ते सिल्लेखाना ३० मीटर रस्ता, पैठणगेट ते सब्जीमंडी ९ मीटर रस्ता आणि पैठणगेट ते खोकडपुरा हा १५ मीटर रस्ता याप्रमाणे मार्किंग करून ८५ मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आल्या. तसेच महापालिका प्रशासकांनी आदेश दिल्यानुसार पैठणगेट ते क्रांती चौक या रस्त्यावरही मार्किंग करण्यात आली आहे. या मार्गावरील अतिक्रमणावरही मनपाचा हातोडा चालणार असून, मंगळवारी अतिक्रमण विभागप्रमुख संतोष वाहुळे, झोन दोनचे सहायक आयुक्त रमेश मोरे, अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त संजय सुरडकर यांनी मार्किंग केलेल्या मालमत्तांची पाहणी करून मालमत्ताधारकांना तातडीने साहित्य काढून घेण्याची सूचना केली. तसेच बुधवारपासून पाडापाडीला सुरुवात करणार असल्याचे वाहुळे यांनी मालमत्ताधारकांना सांगितले.
या रस्त्याचे होणार रुंदीकरण
पैठणगेट ते सिल्लेखाना चौक हा रस्ता ३० मीटरचा तसेच पैठण गेट ते सब्जीमंडी हा रस्ता ६ मीटरचा, पैठण गेट ते खोकडपुऱ्याकडे जाण-ारा रस्ता १५ मीटर रुंदीचा आहे. त्यानुसार रस्त्यांचे रुंदीकरण केले जाणार आहे.
रस्त्यांना अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवणार - पैठणगेट येथे बुधवारी सकाळी अनधिकृत व अतिक्रमित बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे. पैठण गेट ते सब्जी मंडी, पैठणगेट ते खोकडपुरा या दोन्ही रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवली जाणार आहेत. या रस्त्यावरील सनी सेंटर, त्या लगतची ज्यूस सेंटरची व मोबाईलची दुकानेही पाडण्यात येतील. तर पुढील आठवड्यात उर्वरित सहा-सात रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात येतील.संतोष वाहुळे, सनियंत्रण अधिकारी, अतिक्रमण विभाग. मनपा
असा असणार फौजफाटा
१० जेसीबी
१० टिप्पर
२ पोकलेन
२ अग्निशमन बंब
२ कोंडवाडे
२ ऍम्ब्युलन्स
१०० मनपा कर्मचारी
१५० पोलीस
५ पथके करणार कारवाई
5 पथके करणार कारवाई
अतिक्रमण काढण्यासाठी ५ पथके तयार करण्यात आली आहेत. या प्रत्येक पथकात एक वरिष्ठ अधिकारी यांच्यासह नगररचना, अतिक्रमण विभाग, नागरी मित्र पथक तसेच मनपाच्या अन्य विभागाचे अधिकारी कर्मचारी असणार आहेत.
सनी कॉर्नरवरही हातोडा
सनी कॉर्नर ही पैठणगेट परिसरातील वादग्रस्त इमारत आहे. नियमानुसार ३० मीटरच्या रस्त्यावर पार्किंग असणे आवश्यक आहे. परंतु बांधकामच नियमबाह्य असल्याने पार्किंगकडे दुर्लक्ष केले. यापूर्वी आजी माजी महापौरांनी या इमारतीला कारवाईपासून वाचविले. परंतु यंदा पथक ही इमारतीही पाडणार आहे.
6 दुकाने मनपाच्या जागेत
पैठणगेट येथील महापालिका पार्किंगच्या समोरील बाजूस असलेल्या लक्की ज्यूस सेंटरच्या आजूबाजूची सुमारे १६ दुकाने महापालिकेच्या जागेत आहेत. या जागेचे भाडेही महापालिकेला मिळत नाही. दुकानदारच लाखोंचे भाडे वसूल करतात.