

छत्रपती संभाजीनगर : दुकानाचा रस्ता अडविण्यावरून तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वादातून सोमवारी (दि.१०) रात्री सव्वा दहाच्या सुमारास पैठणगेट येथे चौघांनी इमरान अकबर कुरेशी (३३, रा. सिल्लेखाना) यांची गळ्यात चाकू खुपसून वार करत निघृण हत्या केली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेने मुख्य आरोपी शेख परवेज शेख महमूद (३८, रा. सईदा कॉलनी, जटवाडा रोड), एम.आर. मोबाईलचा मालक शेख सलीम शेख शरीफ (३८), शेख खय्युम शेख शरीफ (४२) आणि शेख फैजल शेख नाजिम (२३ तिघेही रा. खोकडपूरा) यांना रात्री उशिरा अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली. चौघांना १७नोव्हेंबरपर्यंत न्यायलयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
फिर्यादी इब्राहिम नजीर कुरेशी (३५, रा. सिल्लेखाना) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा चुलत भाऊ मयत इमरान कुरेशी हा पैठणगेट येथील मोबाईल शॉपी मालक आरोपी सलीम शेखच्या एस. एस. मोबाईल शॉपसमोरील भुर्जीच्या गाडीवर सायंकाळच्यावेळी भुर्जी खाण्यासाठी वरचेवर उभा राहत असल्याच्या कारणावरून त्यांच्यात तीन दिवसांपासून वाद सुरू होता. शनिवारी कलीम कुरेशी यांच्या समक्ष दोघांमध्ये समझोता झाला होता. तर पोलिसांच्या माहितीनुसार, अंडाभुर्जीची गाडी आरोपींच्या दुकानासमोर उभी असायची. त्यात इमरान त्याची दुचाकी लावून रस्ता अडवत असल्याने वाद विकोपाला गेला होता.
सोमवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास मयत इमरान, चुलत भाऊ इब्राहिम आणि जिजा हारून उस्मान कुरेशी हे तिघे अंडाभुर्जी खात बसले होते. आरोपी परवेजने त्याच्या एम. आर. मोबाईल शॉपीमधून त्यांना शिवीगाळ करत इधर क्या देख रहा असे म्हणत वाद घातला. चाकू घेऊन थेट इमरानच्या गळ्यावर वार करताच तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. हारून यांच्या हातावर चाकूचा वार केला. इब्राहिमवर वार करत असताना त्याने परवेजचा हात पकडून ठेवला. त्याने हाताला झटका देत एअरटच मोबाईल शॉपी आणि डीएच मोबाईल शॉपी या दुकानांमधून अन्य आरोपींच्या मदतीने तेथून पळ काढला. सलीम शेखच्या सांगण्यावरूनच हत्या केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक पवन चौधरी करत आहेत.
चारही आरोपी भाऊबंद, तिघांची मोबाईल दुकाने आरोपी परवेज याचे एम आर मोबाईल शॉप, सलीमचे एसएस मोबाईल शॉप तर कय्यूमचे डीएच मोबाईल शॉप असे तिघांचे ५० फुटांच्या अंतरात तीन स्वतंत्र दुकाने आहेत. सलीम आणि खय्युमचा परवेज हा सख्खा चुलत भाऊ तर फैजल हा पुतण्या आहे तो खय्युमसोबत दुकानावर काम करायचा. घटनेनंतर गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अर्जुन कदम, प्रवीण वाघ, अंमलदार राजेंद्र साळुंके, गुप्ता, विजय निकम, काळे, तायडे यांच्या पथकाने चौघांना रात्रीच बेड्या ठोकल्या. परवेज सब्जी मंडी भागातीलच इमारतीत लपला होता. अन्य दोघांना घरातून तर फैजलला कमळापूर भागातून उचलले.
मेडिकलवर दगडफेक, दुचाकींची तोडफोड
दफनविधी झाल्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असताना दुपारी एक ते दिड आणि सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास सिल्लेखाना येथून पंधरा ते वीस जणांचा जमाव अचानक आरडाओरड करत पैठणगेट सब्जिमंडी गल्लीत शिरला. जमावाने नागरिकांच्या दहा ते बारा दुचाकी, चारचाकी वाहनांवर दगडफेक करुन मोठे नुकसान के ले. एका मेडिकलवर दगडफेक करत काचा फोडल्या. या प्रकारामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक आयुक्त सागर देशमुख, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, विशेष शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, क्रांती चौकचे सुनील माने, सिटी चौक ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी, वाळूजचे निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्यासह दंगा काबू पथकाच्या सशस्त्र तुकड्या, राखीव पोलिस बलाच्या जवानांनी पैठणगेट, खोकडपुरा, सिल्लेखाना भागात दोन वेळा पथसंचलन करून जमाव हुसकावून लावला. याप्रकरणी जमावविरुध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात वेगळा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पीएसआय देवीदास शेवाळे करत आहे.
व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण, दिवसभर दुकाने बंद
सोमवारी रात्री संतप्त जमावाने सब्जी मंडी, बागवान मस्जिद भागात तीन वाहनांची तोडफोड केली होती. रात्रभर पैठणगेट भागात असलेला तणाव दुसऱ्या दिवशीही दिवसभर कायम होता. सिल्लेखाना चौकापासून पैठणगेट परिसर, सब्जी मंडी, टिळकपथ सादिया टॉकीजपर्यंत मोबाईल मार्केटसह अन्य दुकाने बंद होती. हत्येच्या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
चौकात कडा पहारा
हत्येच्या घटनेनंतर जमाव आक्रमण झाल्याने पोलिसांनी सब्जी मंडी आणि मयत इमरान यांच्या घरापासून सिल्-लेखाना चौकापर्यंत सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त नेमला होता. रात्रीपासून वरिष्ठ पोलिस अधिकारी, शहरातील विविध पोलिस ठाण्याचे अधिकारी बंदोबस्तकामी तैनात होते. सिल्लेखाना ते सावरकर चौक रस्त्याची एक बाजू दुपारी पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केली होती.