छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या ई-ऑफिस प्रणालीत संचिका प्रलंबित ठेवण्यास आता लगाम घालण्यात आला आहे. प्रत्येक संचिका आठ दिवसांच्या आत निकाली काढण्याचे आदेश आयुक्त अमोल येडगे यांनी दिले असून, मुदत उलटल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला विलंबाच्या कालावधीनुसार प्रतिफाईल प्रतिदिन दंड भरावा लागणार आहे. यात प्रलंबित फाईलींसाठी १ ते ५० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे ई-ऑफिसवरील प्रलंबित फाईलींचा निपटारा करण्याची जबाबदारी आता अधिकाऱ्यांवर निश्चित झाली आहे.
महापालिका मुख्यालयासह झोन कार्यालयांमधील संचिका आणि पत्रव्यवहार ई ऑफिसच्या माध्यमातून ऑनलाइन पाठविण्यात येत आहेत. संबंधित कर्मचारी अथवा विभागप्रमुखांकडे संचिका प्राप्त झाल्यानंतर आवश्यक अभिप्राय, स्वाक्षरी आणि पुढील कार्यवाही करून ती वरिष्ठ स्तरावर पाठविणे अपेक्षित आहे. प्रशासकीय कामकाजातील विलंब कमी करण्यासाठी प्रत्येक संचिकेसाठी आठ दिवसांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
ही मुदत संपल्यानंतरही फाईल प्रलंबित राहिल्यास दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार आठ ते १४ दिवस संचिका प्रलंबित राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यावर प्रतिफाईल प्रतिदिन एक रुपया दंड आकारला जाईल. तसेच १५ ते २९ दिवस विलंब झाल्यास हा दंड प्रतिदिन पाच रुपये असेल. तर ३० ते ६० दिवस संचिका प्रलंबित ठेवल्यास प्रतिफाईल प्रतिदिन तब्बल ५० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
दरम्यान, ई-ऑफिसमुळे संचिका कोणत्या विभागात आणि कोणत्या अधिकाऱ्याकडे किती दिवसांपासून प्रलंबित आहे, याची माहिती ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विलंबासाठी जबाबदार अधिकारी निश्चित करण्याबरोबरच फाईलच्या प्रत्येक टप्प्यावर प्रशासनाला देखरेख ठेवता येणार आहे. निर्णय प्रक्रियेला गती मिळावी, नागरिकांशी संबंधित प्रस्ताव, पत्रव्यवहार आणि प्रशासकीय निर्णय अनावश्यकपणे रखडू नयेत, यासाठी विभागप्रमुखांनी कालमयदिचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.