Sambhajinagar Dussehra Market Turnover file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Dussehra Market Turnover : दुष्काळाच्या सावटातही बाजारपेठेला ५०० कोटींचे तोरण

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांनी केली दणक्यात खरेदी

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : दुष्काळाचे सावट असले, तरी विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मंगळवारी (दि.२०) शहरवासियांनी मोठ्या दणक्यात खरेदी केली. सकाळपासूनच बाजारपेठांमध्ये रेलचेल सुरु होती. नविन कपडे, नवे वाहन, नवे घर, सोने-चांदीचे दागिने यासह विविध गृहउपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची उदंड गर्दी झाल्याने दिवसभरात सुमारे ५00 कोटी रुपयांहून अधिकची उलाढाल झाल्याचे जिल्हा व्यापारी महासंघाचे कोषाध्यक्ष जयंत देवळाणकर यांनी सांगितले.

विजयादशमीच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे खरेदीसाठी मोठी गर्दी होत असल्याने व्यापारीवर्गाला वर्षभर या दिवसाची प्रतिक्षा असते. मात्र, यंदा दुष्काळाने बाजारपेठेला फटका बसण्याच्या शक्यतेने व्यापाऱ्यांची चिंता वाढवली होती. मात्र, ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर मंगळवारी बाजारात झालेल्या ग्राहकांच्या गर्दीने व्यवसायाला नवे सोनेरी तोरण चढवले.

कपडा बाजारात ५ कोटींची उलाढाल

फॅशनच्या जमान्यात आजकाल नवीन कपडे खरेदीसाठी बाजारात रोजच रेलचेल सुरु असते. सणासुदीत मात्र, नवीन कपडे खरेदीसाठी गर्दी होते. यावर्षी दुष्काळामुळे नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच कपडा मार्केटवर परिणाम जाणवला. ऐन दसऱ्या मुहूर्ताच्या दिवशी आज झालेल्या व्यवसायाने दिलासा मिळाला. त्यामुळे टिळकपथ कपडा मार्केटसह शहरात नविन कपडे खरेदीची उलाढाल ५ ते ६ कोटीपर्यंत झाली असावी, असे कपडा व्यापारी गुरदीप सिंग सलुजा यांनी सांगितले.

इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये ५० कोटीची उलाढाल

ऑक्टोंबर हीटमुळे यंदाचा दसरा शहरातील इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी चांगला ठरला. ईएमआय आणि फायनान्स सुविधेमुळे सर्वच इलेक्ट्रॉनिक्स शोरुम, दुकानांमध्ये ग्राहकांची रेलचेल सुरु होती. स्मार्ट टिव्ही, ५५ इंची एलईडी, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मिक्सर, मायक्रोव्हेवर, ज्यूसर, रोटी मेकर, वॉटर प्युरिफायरसह गृहउपयोगी वस्तू खरेदीसह ए.सी.ला अधिक मागणी होती. दिवसभरात शहरातील सर्व इलेक्ट्रॉनिक्स दुकानांचा एकूण सरासरी ५० कोटीहून अधिकची उलाढाल झाल्याचे इलेक्ट्रॉनिक्स असो.चे माजी अध्यक्ष व व्यापारी संजय संघवी यांनी सांगितले.

पाचशे गृहप्रवेश, एक हजार घरांचे बुकिंग

टोयोटा-जेएसडब्ल्यूसह प्रस्तावित कंपन्यांमुळे आपल्या शहराची महानगर होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यामुळे घरांच्या किंमती वाढणार असल्याने आजचा दसराच्या दिवस बांधकाम क्षेत्राला नवी उभारी देणारा ठरला. शहरातील विविध भागातील फ्लॅट, घरे, सदनिका, प्लॉट मिळून एक हजाराहून अधिक बुकिंग झाले. या शुभमुहूर्तावर पाचशे कुटूंबाने आपल्या हक्काच्या घरात प्रवेश केला. एकूण गृहप्रकल्पात नवनवीन स्किमअंतर्गत घर खरेदी सुलभ आणि सहज झाल्याने रिअल इस्टेट क्षेत्रात फिलगुड वातावरण असल्याचे क्रेडाईचे माजी अध्यक्ष विकास चौधरी यांनी सांगितले.

सराफा बाजाराला १० कोटीची झळाळी- संपूर्ण मुहूर्त असलेल्या दसऱ्याच्या दिवशी सोने-चांदी खरेदी शुभ मानली जाते. मात्र, यंदा दुष्काळ आणि सोने-चांदीच्या वाढत्या दराचा परिणाम सराफा बाजारावर जाण‌वला. दुपारनंतर ग्राहकांचा प्रतिसाद वाढल्याने दसऱ्याच्या मुहूर्तावर शहरातील सराफा बाजारात सुमारे १० कोटीपर्यंत उलाढाल झाली. सोन्याचे दागिने सोबतच पिवर विडा, १ ग्रॅम, पाच ग्रॅम आणि १० ग्रॅमचे कॉईन्स खरेदीला पसंती दिली. सोन्याचा भाव प्रति तोळा १ लाख ४९ हजार ८०० रुपये होता. तर चांदी २ लाख १० हजार रुपये किलो.
राजेंद्र मंडलिक, अध्यक्ष जिल्हा सराफ असो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT