छत्रपती संभाजीनगर : जिल्हा बँक निवडणुकीसाठीच्या जाहीर प्रारूप मतदार यादीत राज्याचे मंत्री अतुल सावे, आ. रंजना जाधव, भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह चर्चित १२ जणांच्या नावावर आक्षेप घेण्यात आले आहेत. संबंधित नावे मतदार यादीतून वगळण्याची मागणी आक्षेपकर्त्यांनी सोमवारी (दि.११) सुनावणीदरम्यान केली. या आक्षेपांवर अभ्यास करून १८ मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.
येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीपूर्वीच राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी जाहीर प्रारूप मतदार यादीवर प्राप्त एकूण ४८ आक्षेपांवर सोमवारी विभागीय सहनिबंधक कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. विभागीय सहनिबंधक संतोष बिडवई, सहनिबंधक किरण चौधरी, तालुका उपनिबंधक विलास कोळेकर यांच्यासमोर ही सुनावणी झाली. सर्वाधिक आक्षेप नावे कमी करण्यासंदर्भातच होती.
यात प्रामुख्याने आक्षेप क्रमांक-९ कन्नडमधील रिड्डी मोहर्डा वि.का.च्या सदस्य तथा आ. रंजना जाधव, आक्षेप क्रमांक ३५ देवगिरी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे, आक्षेप क्रमांक-४४ सहकार महर्षी आण्णासाहेब पी. के. पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे सभासद प्रतिनिधी असलेले मंत्री अतुल सावे यांच्या नावावर आक्षेप घेण्यात आले. यासह १२ प्रमुख चर्चित नावांवर आक्षेप घेत यादीतून वगळण्याची मागणी करण्यात आली. आता १८ मे रोजी या सुनावणीचा निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर २१ तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
बँकेचे थकबाकीदारांची नावेही यादीत
काही संस्थांनी बैठक न घेता परस्पर ठराव घेतला, तर काहींनी गणपूर्ती नसताना ठराव मंजूर केला. काहींकडे जिल्हा बँकेची थकबाकी असतानाही त्यांची नावे प्रारूप मतदार यादीत आल्याचा आरोप करत आक्षेप घेण्यात आलेत. त्यासंबंधी सुनावणीत सादर केलेले पुरावे व मांडलेली बाजू यांचा अभ्यास करून निकाल जाहीर केला जाईल, असे सहनिबंधकांनी सांगितले. तर आम्ही थकबाकी भरतो, आमच्या प्रतिनिधींचे नाव मतदार यादीत घेण्याचीही मागणी काहींनी केली.
या प्रमुख नावांवर घेण्यात आला आक्षेप
मंत्री अतुल सावे - छत्रपती संभाजीनगर.
किशोर शितोळे- छत्रपती संभाजीनगर.
आ. रंजना जाधव- कन्नड.
नानासाहेब चव्हाण -वैजापूर.
राजेंद्र शेंडे- छत्रपती संभाजीनगर.
विक्रम पवार- छत्रपती संभाजीनगर.
नितीन देशमुख फुलंब्री. जिजाबाई बाबुलाल -फुलंब्री
प्रदीप चव्हाण -सिल्लोड.
शेख सलीम आशक हुसेन -सिल्लोड.
जूनमध्ये निवडणुकीची शक्यता
जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी २१ मे रोजी प्रसिध्द केली जाणार आहे. त्यानंतर बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीची प्रक्रिया खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे. बँकेची निवडणूक जूनमध्ये होण्याची शक्यता आहे