कन्नड/पिशोर : तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनावरे चोरी प्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले चार बोकड आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन असा एकूण १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २८२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी व अन्य शेतकऱ्यांच्या मालकीचे दोन बोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांनी विशेष तपास पथक तयार करून सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला. तपासात गजानन माधव कुमावत (वय ३६, रा. कासोद, ता. सिल्लोड) आणि समाधान पांडू शेळके (वय ३६, रा. कासोद, ता. सिल्लोड) यांची नावे निष्पन्न झाली. त्यानंतर दोघांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले.
पोलीस चौकशीत आरोपींनी पिशोर तसेच अजिंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनावरे चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानुसार पिशोर येथील चोरीस गेलेले दोन बोकड, अजिंठा पोलीस ठाण्यातील चोरीचे दोन बोकड तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन असा १.८० रुपये लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली असून, पुढील तपास सुरू आहे. चोरीस गेलेली जनावरे सुखरूप परत मिळाल्याने संबंधित शेतकऱ्यांनी पिशोर पोलिसांचे आभार मानले. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात पोना/३३२ बर्डे, पो. कॉ. गणेश कव्वाल, पवन खंबाट, सपकाळ आणि अन्सार पटेल यांच्या पथकाने केली.