

छत्रपती संभाजीनगर : ग्राहकांनी परत केलेल्या अॅमेझॉनच्या महागड्या वस्तू हातोहात लांबवून, त्या रिकाम्या खोक्यांमध्ये चक्क कागदाचे तुकडे भरून कंपनीची फसवणूक करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा प्रताप उघडकीस आला आहे. हा प्रकार १ मार्च ते २५ मे या काळात चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील 'इंटेक्स ट्रान्सपोर्ट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड'च्या गोदामात घडला.
आनंद दाभाडे (२१, रा. प्लॉट क्र ३५, मयूर पार्क) असे संशियित कर्मचाऱ्याचे नाव आहे. या कर्मचाऱ्याने तब्बल ७ लाख ३० हजार ८१२ रुपयांच्या वस्तू चोरल्याचा आरोप आहे. याप्रकरणी रविवारी (दि.२) एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंदे (३८, रा. अकुर्डी, पुणे) यांच्या फिर्यादीनुसार, ही कंपनी फिर्यादी गोदामाचे व्यवस्थापक मयुर भीमराव अॅमेझॉनकडून आलेले पार्सल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे आणि ग्राहकांनी नाकारलेले पार्सल पुन्हा अॅमेझॉन कंपनीला परत पाठवण्याचे काम करते. चिकलठाणा एमआयडीसीतील (प्लॉट नं सी २८) गोदामात १५० कामगार तीन शिफ्टमध्ये काम करतात. १ मार्च ते २५ मे २०२६ या दरम्यान ग्राहकांनी नाकारलेल्या अनेक वस्तू कंपनीने स्कॅन करून पुन्हा अॅमेझॉनला पाठवल्या होत्या.
मात्र, अॅमेझॉन कंपनीने इंटेक्सला ई-मेल करून कळवले की, त्यांना प्राप्त झालेल्या तब्बल ३३९ वस्तूंच्या पार्सलमध्ये मूळ वस्तू नसून केवळ रिकामे खोके आणि कागदाचे तुकडे आहेत. हा ई-मेल वाचताच व्यवस्थापनाच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी गोदामातील कामगारांकडे चौकशी केली, मात्र कोणीही उत्तर दिले नाही. अखेर व्यवस्थापक शिंदे यांनी गोदामातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, तिथे कामाला असलेला आनंद दाभाडे हा हातोहात वस्तू चोरी करत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
महागडे मोबाईलसह ३३९ वस्तू गायब
आरोपी आनंद दाभाडे याने ग्राहकांनी परत केलेल्या ३३९ पार्सलमधून अतिशय महागड्या वस्तू लंपास केल्या. यामध्ये ११ मोबाईल, हेडफोन, घड्याळे, मीडिया प्लेयर, स्वयंपाकाची इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि ट्रिमर, घरगुती उपकरणे, कपडे, सौंदर्य प्रसाधने, लहान मुलांची उत्पादने आणि खेळाचे साहित्य या सर्व वस्तूंची एकूण किंमत ७ लाख ३० हजार ८१२ रुपये एवढी आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भारत पाचोळे करत आहेत.