

छत्रपती संभाजीनगर : वृद्ध महिलांना 'लॉटरी'लागल्याचे आमिष आणि 'पोलिस' असल्याची बतावणी करून लुटणारा सराईत भामट्या आफताब ऊर्फ फहीम अहमद शेख (५२) याला अटक केल्यानंतर, आता या गुन्ह्यातील त्याचा साथीदार आणि मेव्हणा (बहिणीचा पती) इरफान खान रहीम खान (४०, रा. किराडपुरा) यालाही गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आफताबला मदत करणाऱ्या इरफानकडून ३ तोळ्यांची सोन्याची चेन आणि गुन्ह्यात वापरलेली एक कार जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.
आफताबच्या चौकशीत त्याचा मेव्हणा इरफान हाही सामील असल्याचे समोर आले. २ ऑगस्ट रोजी गुन्हे शाखेने इरफानला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्याने आफताबसोबत शहरात अनेक ठिकाणी बतावणी केल्याचे आणि सोने विकण्यासाठी मदत केल्याचे कबूल केले. मे २०२५ मध्ये दोघांनी जवाहरनगर ठाण्याच्या हद्दीतील सुखद सहवास कॉलनीत मंगला गंडागुळे (७५) या आजींना आम्ही पोलिस आहोत, अशी बतावणी करून त्यांच्या गळ्यातील ३ तोळ्यांची सोन्याची चेन लुटली होती.
माझ्या मुलाला कॅन्सर आहे, औषधोपचारासाठी पैशाची गरज आहे, असे सांगूनही चेन विकण्यासाठी इरफानने आमेर खान नावाच्या व्यक्तीला दिली होती. गुन्हे शाखेने कन्नड गाठून ती ३ तोळ्यांची चेन जप्त केली.
इरफानला पुढील तपासासाठी जवाहरनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हर्मूल येथील गुन्ह्यात जाण्यासाठी पळून आफताबने वापरलेली कार (एमएच-२०-बीवाय-५५५६) जप्त केली. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त शशिकांत सातव, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, संदीप तायडे, विजय निकम, प्रदीप दंडवते, योगेश नवसारे, जालिंदर गोरे, राजेश यदमळ, राहुल बंगाळे, विजय घुगे, दत्तात्रय गरड आणि संतोष चौरे यांच्या पथकाने केली.
फळ विक्री सोडून तोतयेगिरी
आरोपी इरफानला आफताबने पैसे दिल्यानंतर त्यातून कार खरेदी केली होती. दोन वर्षांपूर्वीपर्यंत इरफान फळ विक्रीचा व्यवसाय करत होता, मात्र आफताबसोबत तोतयेगिरी करून सोने लुबाडून मोठी माया दोघांनी जमवली होती. त्यातून मौजमजा सुरू असतानाच गुन्हे शाखेने दोघांचा करेक्ट कार्यक्रम केला.
आतापर्यंत १० गुन्हे उघड
या कारवाईमुळे गुन्हे शाखेने आतापर्यंत शहरातील तोतयागिरीचे ९ आणि नागपूर शहरातील दुचाकी चोरीचा १ असे एकूण १० गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच एकूण २९.५ तोळे सोने, दुचाकी व कार असा ३५ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.