रंगीबेरंगी विद्युत रोषणाईच्या जादुई प्रकाशात न्हाऊन निघालेला ऐतिहासिक बीबी का मकबरा... सायंकाळच्या या मनमोहक रूपाने पर्यटकांना घातलेली भूरळ 
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Bibi Ka Makbara|रंगांच्या जादुई दुनियेत न्हाऊन निघाला बीबी का मकबरा

Bibi Ka Makbara Chhatrapati Sambhajinagar light display- झगमगत्या विद्युत रोषणाईने ऐतिहासिक वैभवाला नवा साज : सणासुदीच्या सुट्ट्यांत देशी-विदेशी पर्यटकांची मांदियाळी

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: दिव्यांच्या रंगोत्सवात उजळलेला शुभ्र घुमट, प्रकाशाच्या सोनेरी छटांनी सजलेले उंच मिनार आणि झगमगत्या रोषणाईत न्हाऊन निघालेली भव्य वास्तू... असे मनमोहक दृश्य सध्या बीबी का मकबऱ्यात अनुभवायला मिळत आहे. सायंकाळ होताच या ऐतिहासिक वास्तूचे रूप जणू एखाद्या जादुई नगरीत रूपांतरित होते. या देखण्या सोहळ्याने पर्यटकांना भुरळ घातली असून, सणासुदीच्या सुट्ट्यांमुळे मकबऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे.

दख्खनचा ताज म्हणून सुप्रसिद्ध असलेला ऐतिहासिक बीबी का मकबरा दिवसाच्या उजेडात आपल्या भव्यतेने लक्ष वेधून घेतो. मात्र रात्रीच्या प्रकाशात अधिकच देखणा भासत आहे. यावरील आकर्षक विद्युत रोषणाईमुळे प्रवेशद्वाराची भव्यता, मध्यभागी डौलाने उभा असलेला घुमट आणि चारही दिशांना उंचावलेले मिनार एका वेगळ्याच सौंदर्याने उजळून निघत आहेत. रंगांच्या बदलत्या छटा या वास्तूच्या सौंदर्यात नवी मोहिनी निर्माण करत आहेत. यासह परिसरातील सजावटीमुळे या देखाव्याला आणखी आकर्षक किनार लाभली आहे.

या नयनरम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी शहरासह राज्याच्या विविध भागांतून पर्यटक कुटुंबीय आणि मित्रमंडळींसह दाखल होत आहेत. परदेशी पाहुण्यांनाही या ऐतिहासिक वास्तूची स्थापत्यशैली आणि भव्यता खुणावत आहे. रोषणाईच्या पार्श्वभूमीवर छायाचित्रे टिपण्याचा आणि सेल्फी काढण्याचा उत्साह पर्यटकांमध्ये दिसून येत आहे.

प्रत्येक कोपऱ्यातून मकबऱ्याचे वेगळेच रूप कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या ऐतिहासिक वारशाचा अभिमान आणि आधुनिक विद्युत सजावटीचा देखणा मिलाफ यामुळे बीबी का मकबऱ्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. सणासुदीच्या आनंदाला या झगमगाटाची जोड मिळाल्याने शहराच्या पर्यटनवैभवाला जणू नवी झळाळी प्राप्त झाली आहे. प्रकाशछटांची पर्यटकांना भुरळ दिवसाच्या उजेडात शुभ्र दिसणारा मकबऱ्याचा घुमट सायंकाळच्या रंगीबेरंगी प्रकाशात वेगळेच रूप धारण करत आहे. उंच मिनार आणि भव्य प्रवेशद्वारावर पडणाऱ्या प्रकाशछटांची पर्यटकांना भुरळ पडत असून क्षणभर थबकायला भाग पाडत असल्याचे दिसून येत आहे.

आठवणींच्या फ्रेममध्ये ऐतिहासिक वैभव

रोषणाईने सजलेल्या मकबऱ्यासोबत छायाचित्रे टिपण्याची पर्यटकांमध्ये चढाओढ सुरू आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण या देखण्या दृश्याचा आनंद घेत आहेत. विदेशी पर्यटकही वास्तूचे सौंदर्य कॅमेऱ्यात साठवत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT