छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात वाळू घाटांच्या लिलावासाठी गौणखनिज विभागाकडून पूर्व प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यात राज्य पर्यावरण समितीसह इतर समित्यांनी जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर आणि पैठण या तीन तालुक्यांतील ८ वाळू घाटांना मंजुरी दिली आहे. त्यानुसार या घाटांसाठी लवकरच लिलावाची प्रक्रिया होणार आहे. तर उर्वरित ३२ घाटांसाठी सध्या स्थानिक स्तरावरच प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा गौण खनिज अधिकारी ऋषिकेश डांगे यांनी दिली.
राज्य शासनाने वाळू लिलावासाठी पूर्व तयारी सुरू केली आहे. यात पहिल्यांदा समितीकडे सादर करण्यात आलेल्या ८ घाटांच्या प्रस्तावांना समितीने मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता जिल्हा गौण खनिज विभागाच्या वतीने निविदा प्रक्रिया राबवून पुढील नियोजन केले जात आहे. त्यासोबतच जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये असलेल्या ३२ घाटांचा प्रस्तावही तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
यात पहिल्यांदा तलाठींकडून माहिती मागवून त्यावर शासनआदेशानुसार प्रक्रिया करण्यात येते. त्यानंतर प्रस्ताव स्थानिक समितीकडे सादर करून त्यावर जनसुनावणी घेण्यात येते. या प्रक्रियेनंतर अहवाल जिल्हा समितीकडून राज्याच्या दोन्ही समित्यांसह नागपूरच्या समितीकडे सादर करण्यात येते. राज्याच्या दोन समित्या यावर निर्णय घेतात. त्यांनी मंजूर केलेल्या घाटांचीच निविदा प्रक्रिया केली जाते. लवकरच त्याबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे. तोपर्यंत प्रशासन मंजूर घाटांची प्रक्रिया पूर्ण करणार आहे.
वाळू घाटांना दुष्काळाचा फटका
यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे बहुतांश लघु, मध्यम प्रकल्पांनी तळ गाठला आहे. तसेच नद्यांचे पात्रही कोरडे पडले आहेत. त्यामुळे वाळू घाटांना मागणी अधिक असेल, अशी स्थिती आहे. परंतु, नदी, आणि प्रकल्पांच्या रक्षणासाठी स्थानिकांकडून वाळू घाटांना विरोध होण्याची शक्यता देखील वाढली आहे. त्यामुळे यंदा कमी वाळू घाट लिलावपात्र ठरतील का, असाही प्रश्न निर्माण होत आहे.