Chhatrapati Sambhaji Nagar Airport name officially approved.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा चिकलठाणा विमानतळाच्या नामकरणाची प्रक्रिया आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात आली असून, मंगळवारी (दि.२३) विमानतळाच्या भिंतीवर छत्रपती संभाजीनगर विमानतळ, असे नवे नाव लिहिण्यात आले. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने विमानतळ परिसरात विविध ठिकाणी नव्या नावाचे फलक लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
नागरी उड्डयन मंत्रालयाने नुकतीच विमानतळाचे नाव छत्रपती संभाजीनगर विमानतळ करण्यास अधिकृत मान्यता दिली आहे. या परवानगीनंतर विमानतळावरील जुन्या नावाचे फलक, दिशादर्शक पाट्या तसेच अंतर्गत सूचना फलक बदलण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. ही कार्यवाही टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार असून, प्रवाशांना कोणतीही अडचण होऊ नये याची दक्षता घेण्यात येत आहे.
शहराच्या नामांतरानंतर विमानतळालाही नवे नाव देण्याचा निर्णय झाल्याने प्रशासकीय स्तरावर आवश्यक बदल करण्यात येत आहेत. विमानतळाच्या प्रवेशद्वारापासून ते अंतर्गत भागापर्यंत सर्व ठिकाणी नव्या नावाचे फलक दिसू लागले आहेत. मंगळवारी विमानतळाच्या भिंतीवर उमटलेले नवे नामकरण लक्षवेधी ठरले.
नवे नाव अधिकृत झाल्यानंतर येत्या काळात विमान तिकीट, उड्डाण वेळापत्रक, संकेतस्थळे तसेच शासकीय कागदपत्रांमध्येही छत्रपती संभाजीनगर विमानतळ हेच नाव वापरले जाणार आहे. त्यामुळे विमानतळाशी संबंधित सर्व प्रशासकीय व तांत्रिक नोंदी एकसंध करण्यात येणार आहेत.