

Deadly kite Manja is being smuggled into the city via Surat and Indore.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सुरत येथे मांजा खरेदीसाठी गेलेल्या तरुणाने तस्करांच्या संपर्कात येताच त्याच्यामार्फत इंदौर येथून मोठा साठा मागविला. ट्रान्सपोर्टने आ-लेला मांजा सोडवून नेताच गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना बेड्या ठोकल्या. ही कारवाई मंगळवारी (दि.२३) बन्सीलालनगरात करण्यात आली. ऋतिक दिलीप लोधे (२२, रा. पदमपुरा) आणि गणेश रामकिसन औताडे (२२, रा. धेरडा, ता. गंगापूर) याना अटक केली. तर मांजाचा डीलर नासेर (रा. इंदौर) यालाही आर-ोपी केले आहे. दोघांकडून कारसह २८८ मांजाचे गट्टू जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.
अधिक माहितीनुसार, मुख्य आरोपी ऋतीक लोधे हा पतंग विक्रीचा व्यवसाय करतो. त्याने पंतग विक्रीच्या आडून मांजा विक्रीचा गोरखधंदा सुरू केला. मंगळवारी इंदौर येथून एका कुरीअर-द्वारे त्याने मांजाचे मोठे पार्सल मागविले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांना प्राप्त झाली होती. त्यानी तात्काळ उपनिरीक्षक संदीप काळे यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार काळे यांनी कैलास काकड, विजय निकम, मनोज विखनकर, बाळू नागरे, विजय घुगे, प्रमोद सुरसे, सागर साळवे, अक्षय नाटकर या पथकासह बन्सीलालनगर भागात सापळा रचून दोघांना पकडले.
कारच्या झडतीत सहा गोण्यांमधून २८८ मोनो फील गोल्ड या मांजाचे गट्टू जप्त केले. तिघांविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न यासह अन्य कलमाखाली वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेने आतापर्यंत पकडले २९ आरोपी
पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी मांजाबावत कडक कारवाईचे आदेश दिल्यानंतर गुन्हे शाखेने कारवाईचा घडाका लावला आहे. मागच्या १५ दिवसांत १२ कारवाया करून मांजाचा गोरखधंदा करणाऱ्या २६ आरोपींना बेड्या ठोकल्या. तसेच तीन अल्पवयीनही पकडले. या कारवायांमध्ये १ हजार ६८३ मांजाचे गट्टू जप्त केले आहे. त्यातुलनेत स्थानिक पोलिसांना मांजा पकडण्यात काहीही इंटरेस्ट नसल्याचे दिसून येत आहे.
खाटू शामच्या दर्शनाला जाताच मांजाचा शोध
पतंग विक्रेता ऋतीक लोधे हा दोन महिन्यांपूर्वी खाटू श्याम येथे दर्शनासाठी गेला होता. तेथून मांजाच्या शोधात सुरतला गेला. तिथे त्याला इंदौरच्या नासेरचा नंबर मिळाला. ऋतीक आणि नासेर यांच्यात विविध मोबाईल नंबरवरून बोलणे झाले. त्यानंतर ऋतीकने इंदौर गाठून १ लाख ९० हजार ६०० रुपयांच्या मांजाची ऑर्डर दिल्यानंतर सोमवारी पार्सल शहरात आले होते.