पैठण, पुढारी वृत्तसेवा: अल्पवयीन मुलीशी लग्न करून व्हिडिओ व्हायरल करणे व बहिणीच्या अपघाताची धमकी देऊन अत्याचार करणाऱ्या पतीसह चार जणाविरुद्ध बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चितेगाव येथील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा व्हिडिओ व्हायरल केला. तसेच बहिणीचा अपघात करण्याची धमकी देऊन तिच्याशी जबरदस्तीने लग्न केले. त्यानंतर नातेवाईकांशी फोनवर संपर्क ठेवण्यास बंदी घालून पतीने आपल्या राहत्या घरी व छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकातील एका हॉटेलवर फेब्रुवारी २०२२ ते १३ सप्टेंबर २०२३ या कालावधीत वारंवार अत्याचार केला.
दरम्यान, पीडित मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर माहेरकडून घर बांधण्यासाठी ५ लाख घेऊन येण्याचा तिच्याकडे तगादा लावला. यासाठी तिला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. हा त्रास असहाय्य झाल्यानंतर पीडितेने बिडकीन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्याकडे तक्रार दाखल केली.
पती योगेश कैलास सोनवणे, सासू सविता कैलास सोनवणे व कैलास रघुनाथ सोनवणे, संदीप सांडू जागीरदार, जयश्री संदीप जागीरदार (सर्व रा. चितेगाव) यांच्याविरुद्ध बालविवाह अधिनियमसह पोस्को कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे करीत आहेत.
हेही वाचा