छत्रपती संभाजीनगर: शहरातील आविष्कार कॉलनीत राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत तरुणीचे नाव निकिता रवींद्र पवार (वय २२) असे असून तिने ‘मम्मी, दादा, आजी-आजोबा मला माफ करा’ अशी ओळ सुसाइड नोटमध्ये लिहून कुटुंबीयांना वेदनेत ढकलले आहे.
निकिता पवार हिने फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले होते. नोकरीच्या निमित्ताने ती दीड महिन्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे आली होती. आविष्कार कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये ती राहात होती. तिच्या सोबतच्या दोन मुली सुट्टीसाठी गावी गेल्याने त्या दिवशी ती एकटीच रूमवर होती.
आत्महत्येच्या आदल्या दिवशी निकीताने आपल्या कुटुंबीयांशी फोनवर बोलताना सांगितले होते की, "तुमच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन येईल, तो ब्लॅकलिस्टमध्ये टाका, त्याचा फोन घेऊ नका." तरीदेखील निकीताच्या कुटुंबीयांच्या मोबाईलवर एका अज्ञात क्रमांकावरून तब्बल २५ कॉल आले. हा क्रमांक कुणाचा आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
कुटुंबीयांच्या मते, निकीताला कोणी तरी सतत त्रास देत होते. ब्लॅकमेलिंगमुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी निकीताचा मोबाईल जप्त केला असून कॉल रेकॉर्ड्स तपासले जात आहेत.
सिडको पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. मोबाईलमधील डेटा, कॉल रेकॉर्ड आणि मेसेजेस तपासले जात आहेत. आरोपी कोण आहे, त्याने नेमका कोणत्या कारणासाठी निकीताला ब्लॅकमेल केले, याचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी शहरात आलेल्या एका तरुणीने केवळ ब्लॅकमेलिंगमुळे आयुष्य संपवले, हा प्रकार चिंताजनक ठरत आहे.