छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या ९२२ इच्छुकांच्या मुलाखतींना आज गुरुवार (दि. १८) पासून आता सुरुवात होणार आहे. परंतु त्यापूर्वीच पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवार निवडीसाठी ३५ ते ४५ वर्षे वयाचा निकष जाहीर केला, तसेच त्याहून अधिक वय असणाऱ्या इच्छुकांचे नाव सर्वेच्या पहिल्या क्रमांकावर आले तरच विचार होईल, असे सांगत त्यांनी इच्छुकांवर बॉम्बगोळाच टाकला. फुलंब्रीतील एका सभेनिमित्त ते बुधवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौरयावर आले होते. त्यांनी भाजपच्या विभागीय कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला.
यावेळी आमदार संजय केणेकर, आमदार अनुराधा चव्हाण, संजय कौडगे, शहर अध्यक्ष किशोर शितोळे, माजी अध्यक्ष शिरीष बोराळकर, अनिल मकरिये, ग्रामीणचे अध्यक्ष संजय खंबायते, प्रशांत देसरडा यांची प्रमुख उपस्थिती होती. महापालिका निवडणुकीसाठी २९ पैकी २२ प्रभागांत भाजपच्या उमेदवारीसाठी तब्बल ९२२ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. यात विविध पक्षांतून भाजपमध्ये उमेदवारीच्या आशेने प्रवेश केलेल्या कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे एकाएका प्रभागात सुमारे ९ ते १२ जण इच्छुक आहेत, या लांबलचक रांगेमुळेच उमेदवार निवडीचे संकट निर्माण झाले आहे. त्यात महायुतीत जागा सोडव्या लागणार आहेच.
दरम्यान, जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्यांच्या बैठकीत मंत्री बावनकुळे यांनी भाजपच्या नव्या केंद्रीय अध्यक्षाच्या वयाचा हवाला देत सांगितले की, पक्षाने केंद्रीय अध्यक्षासाठी ज्यांची निवड केली आहे, ते नेते ४५ वर्षांचे आहेत. त्यामुळे उमेदवारी देतांना आता ३५ ते ४५ वयाचे निकष राहणार असून, त्यानांच प्राधान्याने उमेदवारी देण्यात येईल. त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्यांचे नाव सव्र्व्हेत पहिल्या क्रमांकावर आले, तरच पक्ष त्यांच्या उमेदवारीचा विचार करेल. असेही ते म्हणाले. या बैठकीनंतर भाजपच्या विभागीय कार्यालयातून बाहेर पडणाऱ्या अनेक इच्छुक कार्यकर्त्यांच्या चेहयावर प्रचंड नाराजी आणि रोष दिसून आला.
... तरच नातेवाइकांचा विचार
भाजपच्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या नातेवाइकांबाबत बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नेत्यांचे नातेवाईक भाजपचे कार्यकर्ते असेल तरच त्यांच्या उमेदवारीचा विचार होईल.
नव्या-जुन्यांचा समतोल ठेवणार - भाजपची नेहमीच तरुणांना पुढे आणण्याची भूमिका राहिली आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देतानाही तीच भूमिका राहणार आहे. युवक आणि ज्येष्ठ कार्यकर्ते यांचा समतोल राखूनच उमेदवारी दिली जाणार आहे. वयाचे निकष नवीन नसून नेहमीचेच आहे.किशोर शितोळे, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप