छत्रपती संभाजीनगर

छ.संभाजीनगर : पाचोड पोलीस, जिल्हा बालविकास पथकाने बालविवाह रोखला

अविनाश सुतार

पैठण:  पुढारी वृत्तसेवा: पाचोड पोलिसांच्या हद्दीत एका मंगल कार्यालयात आज (दि.१३) सुरू असलेला एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह पाचोड पोलीस व जिल्हा महिला बाल विकास विभागाच्या पथकाने रोखला. नवरदेव, नवरीला नातेवाईकांना पाचोड पोलीस ठाण्यात आणून सपोनि शरदचंद्र रोडगे यांनी त्यांचे समुपदेशन केले.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदर येथील एका अल्पवयीन मुलीचा विवाह पाथर्डी तालुक्यातील निवडुंगा गावातील एका अल्पवयीन मुलासोबत आज दुपारी पाचोड येथे होणार होता.

याची गोपनीय माहिती छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा महिला बाल विकास विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानंतर याबाबत सुपरवायझर सचिन दौंड यांनी तत्काळ पाचोड पोलीस ठाण्याचे सपोनि शरदचंद्र रोडगे यांनी कळवले. पथकाने पाचोड खुर्द रोडवरील मंगल कार्यालयात जाऊन नवरदेवाचे आई-वडील व नवरीचे आई-वडील यांच्यासोबत चर्चा केली. नवरदेव व नवरी अल्पवयीन असून त्यांचे लग्न लावता येणार नाही.

अठरा वर्षाच्या आत लग्न केल्यास बाल विकास प्रतिबंध अधिनियम २००६ कायद्याखाली गुन्हा दाखल होऊ शकतो. असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे नातेवाईकांसह नवरा नवरीला समुपदेशन करण्यासाठी पाचोड पोलीस ठाण्यात आणले. तेथे सपोनि शरदचंद्र रोडगे, बाल विकास विभागाचे सचिन दौंड यांनी समुपदेशन केले. सोमवारी त्यांना जिल्हा महिला बाल विकास कार्यालयातात हजर राहायला सांगितले आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT