पैठण, पुढारी वृत्तसेवा: राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या विहामांडवा (ता.पैठण) येथील रेणुकादेवी – शरद साखर कारखान्याला ऊस न घालता स्लीप बॉयच्या संगणमताने २ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी पाचोड पोलिसांनी ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रेणुकादेवी शरद साखर कारखान्याला दि. २७ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या दरम्यान अजय बाबासाहेब गर्जे (रा. नालेवाडी, ता. अंबड जि. जालना) यांनी आपल्या वडिलांच्या नावावर ८०. १७९ टन ऊस घातल्याचा रेकॉर्ड तयार करून घेतला. तर ऊस तोडणीची रक्कम ५५ हजार २२६ रुपये मातोश्री महिला अर्बन को. क्रेडिट सोसायटीतील बाबासाहेब जालिंदर गर्जे यांच्या खात्यावर जमा केली.
ऊस कारखान्याला घातल्याचा रेकॉर्ड स्लीप बॉय गणेश अजिनाथ थोरे (रा. केकत जळगाव, ता.पैठण) यांनी तयार केला. तसेच कारखान्याला ऊस न घालता अजय गर्जे याला स्लिप दिली. या वाहनाचे (एम.एच २१ एडी ४२०५) दोन वेळेस वजन दाखवले. अशा प्रकारे अजय गर्जे, बाबासाहेब जालिंदर गर्जे व गणेश अजिनाथ थोरे यांनी संगणमत करून ५७. ८१४ टन ऊस तोडणी वाहतूक असे मिळून एकूण २ लाख ७१ हजार ७०९ रुपयांची फसवणूक केली.
हा प्रकार कारखान्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात उघड झाला. या संदर्भात कारखान्याचे कार्यकारी संचालक नामदेव बावडकर यांनी पाचोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यामुळे फसवणूक करणारे स्लीप बॉय गणेश अजिनाथ थोरे अजय बाबासाहेब गर्जे, बाबासाहेब जालिंदर गर्जे (रा. नालेवाडी, ता. अंबड जि. जालना) यांच्याविरुद्ध सपोनि शरदचंद्र रोडगे यांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राम बाराहाते करीत आहे.
हेही वाचा