Cash worth ₹1.5 lakh stolen from moped storage compartment in just 22 seconds
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बँकेत पैसे भरण्यासाठी निघाल्यानंतर मोबाईलचे चार्जर घेण्यासाठी मित्राच्या ऑफिसमध्ये गेलेल्या एका तरुणाच्या मोपेडची डिक्की उघडून दोन चोरट्यांनी २२ सेकंदात दीड लाखाची रोकड लंपास केली. ही घटना मंगळवारी (दि.१८) दुपारी ४:१० वाजेच्या सुमारास सिडको एन-३ भागातील आरबीएल बँकेसमोर घडली. चार्जर घेऊन १० मिनिटांत तरुण खाली येताच प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शेख ईजान शेख ईसाक (२१, रा. रोजाबाग) याच्या तक्रारीनुसार, तो मोंढा येथील एका कन्स्ट्रक्शन ऑफिसमध्ये काम करतो. मंगळवारी (दि. १८) दुपारी ३:५० वाजेच्या सुमारास ईजानचे मालक सालीक शब्बीर साया यांनी त्याला एसबीआय बँकेत जमा करण्यासाठी दीड लाख रुपयांची रोकड दिली होती.
ईजानने ही रक्कम मालकाच्या 'टीव्हीएस ई मोपेडच्या डिक्कीत ठेवली आणि तो सिडको एन-३ मधील आरबीएल बँकेसमोर आला. दुपारी ४ वाजता त्याने बँकेसमोर गाडी उभी केली. मोबाईलची बॅटरी संपल्याने तो चार्जर आणण्यासाठी बँकेच्या वरच्या मजल्यावर असलेल्या 'झेड इन्फ्रा कन्स्ट्रक्शन' ऑफिसमध्ये आपला मित्र सय्यद फरीद याच्याकडे गेला.
अवघ्या १० मिनिटांत, म्हणजे ४:१० वाजता तो चार्जर घेऊन खाली आला. गाडीजवळ येऊन डिक्की उघडली असता, त्याला डिक्कीत ठेवलेले दीड लाख रुपये गायब असल्याचे दिसले.
चोरटे सीसीटीव्हीत कैद
पैसे गायब असल्याचे पाहून घाबरलेल्या ईजानने बँकेच्या वॉचमनकडे विचारपूस केली. तेव्हा, दोन जण तिथून पळत जाताना दिसल्याचे वॉचमनने सांगितले. त्यानंतर ईजानने सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात दोन अज्ञात व्यक्ती गाडीजवळ येऊन डिक्कीतून दीड लाख रुपये चोरून नेताना स्पष्ट दिसले. पोलिस आता फुटेजच्या आधारे भामट्यांचा शोध घेत आहेत. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल संदीप बीडकर करत आहेत.