कुलकर्णी यांना मारहाण करणाऱ्याला जमावाने चोप दिला. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Car auto rickshaw accident : कार-रिक्षाच्या धडकेनंतर दोन गटांत राडा

भाजपच्या माजी नगरसेवकाला टोळक्याची मारहाण, क्रीडा संकुलासमोरील घटना

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : दर्गा चौकाकडून सूतगिरणी चौकाकडे निघालेल्या भाजपच्या कार्यकर्त्याच्या कारसमोर क्रीडा संकुलाजवळ अचानक रिक्षा आल्याने अपघात झाला. यात रिक्षाचालक जखमी होऊन कारचेही नुकसान झाले.

घटनेनंतर भाजपचे माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी हे मदतीसाठी येताच रिक्षा चालकाने बोलावून घेतलेल्या टोळक्यातील एकाने कुलकर्णी यांच्यावर हात उचलताच मोठा राडा झाला. मारहाण करणाऱ्याला जमावाने बेदम चोप दिला. ही घटना बुधवारी (दि.१७) रात्री पावणेअकराच्या सुमारास घडली.

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचा एक कार्यकर्ता क्रेटा कारने दर्गा चौकाकडून सूतगिरणी चौकाकडे जात होता. विभागीय क्रीडासंकुलाजवळ अचानक एक रिक्षा समोर आल्याने अपघात घडला. यात रिक्षा चालक जखमी झाला.

भाजपच्या कार्यकत्यनि जवळच राहणारे स्थानिक भाजपचे माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी आणि दिलीप थोरात फोन करून मदतीसाठी बोलावून घेतले. त्याचदरम्यान रिक्षा चालकानेही त्याच्या मित्रांना फोन केला. कुलकर्णी हे रिक्षा चालकाची विचारपूस करून दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी बोलत होते. त्याचवेळी एका काळ्या रंगाच्या मोठ्या कारमधून टोळके तिथे आले.

त्यांनी कोणाची कार आहे, असे म्हणत दमदाटी सुरू केली. त्यावर भाजपच्या कार्यकर्त्याने माझी कार आहे, असे म्हटले. त्याचवेळी बाजूला उभे कुलकर्णी यांनी काही वाद नाही, आपण अगोदर रिक्षा चालकाला दवाखान्यात घेऊन जाऊ, असे समजावून सांगत असताना टोळक्यातील एकाने कुलकर्णी यांच्यावर अचानक हात उचलला.

त्यामुळे संतप्त जमावाने हात उचलणाऱ्याला बेदम चोप दिला. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. काही वेळात शेकडोंचा जमाव जमला. घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर पोलिस दाखल झाले. त्यांनी मारहाण करणाऱ्या दोन तीन जणांना ताब्यात घेत ठाण्यात नेले. दरम्यान, पोलिस ठाण्यातही दोन्ही गटांचे लोक आल्याने गोंधळ उडाला होता.

हात उचलणाऱ्याला कपडे फाटेपर्यंत चोप

सुरेंद्र कुलकर्णी यांच्यावर हात उचलणाऱ्याला त्यांच्या समर्थकांनी कपडे फाटेपर्यंत बेदम चोप दिला. त्यामुळे रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहतुकीची कोंडी झाली होती. रस्त्यावरील राडा पाहण्यासाठी अनेक जण थांबले होते.

गैरसमजुतीतून झालेला प्रकार

रिक्षा आणि कारचा अपघात झाल्यानंतर सुरेंद्र कुलकर्णी हे जखमीला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी निघाले तेव्हा तिथे आलेल्या काही तरुणांनी अपघात कुलकर्णी यांनीच केला असल्याच्या समजुतीतून त्यांच्या डोक्यात मारले. त्यावरून हा प्रकार घडला. अद्याप ठाण्यात कोणतीही नोंद नसल्याचे पोलिस निरीक्षक सचिन कुंभार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT