Capacity of electricity substation doubled
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : गंगापूर शहरासह परिसरातील वाढत्या वीजभाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ३३ केव्ही गंगापूर वीज उपकेंद्राची क्षमता दुप्पट करण्यात आली आहे. यापूर्वीच्या ५ एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरऐवजी आता १० एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्यात आला. ४ कोटी रुपये खर्चाच्या या क्षमतावाढीच्या कामाचे उद्घाटन गुरुवारी (दि. ५) आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते करण्यात आले.
या क्षमतावाढीमुळे गंगापूर शहरातील विशेषतः सकाळच्या वेळेतील वाढता वीजभार आणि ओव्हरलोडची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच ७ केव्ही जामगाव व ११ केव्ही मांजरी फिडरवरील गंगापूर शिवार, जाखमाथा, आंबेवाडी आणि मांजरी परिसरातील कृषी वीजग्राहकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. शेतीपंपांचा वीजपुरवठा अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.
यापूर्वी ५ एमव्हीए क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरवर अतिरिक्त भार येत असल्याने वीजपुरवठ्यावर परिणाम होत होता. आता १० एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाल्याने उपकेंद्राची वीजपुरवठा हाताळण्याची क्षमता वाढली आहे. परिणामी शहरासह परिसरातील वीजग्राहकांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे. उन्हाळ्यात या भागातील नागरिकांना दरवर्षी नागरिकांना वीज समस्येला सामोरे जावे लागत होते. ही समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
उद्घाटनप्रसंगी उपकार्यकारी अभियंता अरविंद काळे, सहायक अभियंता भूमिका बनसोडे, सहायक अभियंता चिंचाने, सहाय्यक अभियंता लंगोटे, भागचंद लांडगे यांच्यासह भाजपचे किशोर धनायत, तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदीप पाटील, भाग्येश गंगवाल, डॉ. आबासाहेब शिरसाट, विजय पानकडे, आनंद पाटील, सुरेश शिंदे, कृष्णा सुकाशे, गोपाल वर्मा, रज्जाक पठाण, रामेश्वर पाटील,
दीपक साळवे, राजेंद्र राठोड, दत्तू कराळे, सुनील पाखरे, संदीप आमराव, प्रदीप वंजारे, दीपक बत्तीशे, अमोल लहिरे, काका दंडे, बाबासाहेब लांडे, संदीप मोरे, श्रवण राऊत, रावसाहेब मिसाळ, प्रदीप तोडकर, चंद्रकांत मोरे, कार्तिक पातारे, विकास डुकरे, किरण मनाळ, अमोल शिंदे आदींसह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.