

Sambhajinagar News: District administration provides aid to families of 157 farmers who ended their lives
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शेतातील उभे पीक डोळ्यांदेखत करपते, हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो आणि कर्जाच्या ओझ्याने जगण्याची उमेदही खचते.. सततच्या या संकटाचा सामना करणारे शेतकरी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवीत आहेत. कुटुंबावर केवळ कमावता व्यक्ती गमावण्याचे दुःख कोसळत नाही, तर संपूर्ण आयुष्य विस्कटते. मुलांचे भविष्य, रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होतात. या संकटात आर्थिक मदतीसोबतच मायेचा हातही गरजेचा असतो, त्याच भावनेतून दरवर्षाप्रमाणे यंदाही बुधवारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आत्महत्याग्रस्त १५७ शेतकरी कुटुंबीयांना जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांच्या हस्ते दिवाळी भेट देण्यात आली.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, तहसीलदार शिवानंद बिडवे ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष मनसुख झांबड, अग्रवाल युवा मंचचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात शेतकरी कुटुंबांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. जिल्हा प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी सतत जनजागृतीसह नवनवे जोड उद्योगाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
त्याबाबत शासकीय योजनांची माहिती देत त्याचा लाभदेखील दिला जात आहे. असे असतानाही शेतकरी आत्महत्येचाच मार्ग स्वीकारात आहेत. मात्र, त्यामुळे संपूर्ण कुटुंबावरच मोठे संकट कोसळत आहे. या संकटातून त्यांना बाहेर काढून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासन मानवी भावनेतून एक हात मदतीचा हा उपक्रम राबविला आहे.
दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांच्या वेदनांनी ग्रासलेल्या कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला. यंदा जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांत जिल्ह्यात १५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी चांगली व्हावी, यासाठी या सर्व कुटुंबांना दिवाळी वस्तूंच्या किटचे वाटप करून त्यांच्या घरात सणाचा गोडवा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, हा उपक्रम केवळ अन्नधान्याच्या किटपुरता मर्यादित नसून, संकटग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत, रोजगाराचे साधन आणि स्वावलंबनाची दिशा देण्याचा व्यापक प्रयत्न आहे.
प्रशासन शेतकऱ्यांसोबत या कार्यक्रमात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आधार देण्याची ग्वाही दिली. तसेच या दुःखाची भरपाई कोणतीही मदत करू शकत नाही; मात्र संकटात कुटुंबांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी व ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.