Burglary in Bajaj Nagar; Thieves steal jewellery worth lakhs of rupees
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : वाळूज महानगरात चोरीचे सत्र सुरूच असून अज्ञात चोरट्यांनी बजाजनगरातील बंद घर फोडून लाखो रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिणे चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि.६) सकाळी उघडकीस आली. या विषयी मिळालेल्या माहितीनुसार दीपक भीमराव जावकर (रा. घृष्णेश्वर हौसिंग सोसायटी, बजाजनगर) यांच्या काकाचे निधन झाल्याने घराला कुलूप लावून कुटुंबासह ते अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव येथे त्यांच्या मूळ गावी गेले आहेत.
गावाकडे असतांना दीपक हे आजारी पडल्याने गेल्या दहा-पंधरा दिवसापासून ते त्यांची पत्नी दिपीका, मुलगा सौरभ तसेच मुलगी गौरी असे चौघे तिथेच थांबले आहेत. आज सकाळी शेजाऱ्यांना जावकर यांच्या घराच्या दाराचा कोयंडा तुटलेला व दाराला कुलूप दिसून आले नाही. घरात चोरी झाल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी याची माहिती जावकर यांच्या पत्नीला तसेच पोलिसांना दिली.
रात्री उशिरा गावावरून परतलेल्या सौरभने घरात जाऊन पाहिले असता कपाटातील गंठण, पोहेहार, मिनी गंठण, दोन आंगठ्या, कानातील झुंबर, चांदीचे ताट, चांदीचा चौकडा तसेच चांदीची वाटी-चमचा गायब असल्याचे तसेच नकली दागिने व सोन्याची एक नथ कपाटातील सामान अस्तव्यस्त पडलेले दिसून आले.
दरम्यान पोलिसांनी सकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करुन श्वान पथक तसेच ठसे तज्ञांना पाचारण केले. यावेळी पोलिसांनी श्वानच्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र श्वान जावकर यांच्या घरापासून पूर्वेकडे असलेल्या नाल्याजवळ जाऊन थांबला. चोरी केल्यानंतर चोरटे नाल्याच्या संरक्षक भिंतीवरून उड्या मारून पसार झाले असावे असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.