Buddha Jayanti celebrated with a Dhamma Rally, food donation, and awareness programs at sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा तथागत गौतम बुध्द यांच्या २५७० व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि. १) सकाळपासूनच विविध सामाजिक उपक्रमांसह विविध विहारांमधून खीरदान, अन्नदान तसेच धम्म रॅली काढून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्य रॅली अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीने क्रांती चौकातून काढण्यात आली. यात भिक्खू संघासह श्रमणेर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीत बुध्दं, शरणं, गच्छामि... या मंगलमय स्वरांनी शहर बुद्धमय झाले होते. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुध्द जयंतीनिमित्त शुक्रवारी बुध्द वंदना, परित्राणपाठ, धम्मदेसना आणि धम्म रॅली या मंगलमय वातारणाने संपूर्ण शहर बुद्धं, शरणं, गच्छामि... च्या स्वरांनी न्हाऊन निघाले होते. शहरातील सर्वच बुद्धविहारांत खीरदान व अन्नदानांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर बहुतांश ठिकाणी धम्म रॅली काढून बुद्धांचा संदेश उपासकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. भिक्खू संघ आणि श्रामणैर संघानी सिद्धार्थ उद्यानातील गौतम बुद्धांच्या मूर्तीसमोर वंदना घेऊन तेथे उपासकांना धम्मदेसना दिली.
क्रांती चौकातून धम्म रॅली
भिक्खू संघाच्या वतीने शुक्रवारी सकाळी ९ वाजता क्रांती चौकातून धम्म रॅलीला सुरुवात करण्यात आली. रॅलीत भिक्खू संघासह श्रामणेर संघ सहभागी झाला होता. सदरची रॅली ही क्रांती चौकातून निघून नूतन कॉलनी, सिल्लेखाना चौक, पैठणगेट, औरंगपुरा मार्गे भडकलगेट येथे पोहोचली. त्यानंतर पोलिस आयुक्तालयात श्रामणेर संघाला भोजनदान देण्यात आले. भोजनदानानंतर श्रामणेर संघ बुध्दलेणीकडे रवाना झाला. दुपारी १ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत लेणीवर धम्मदेसना, बुध्द वंदना, परित्राणपाठ, रतन सुत्त महामंगल सुत्त, आशीर्वाद, तसेच आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर बुध्द, भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडला.
धम्मरत्न मंडळातर्फे टीव्ही सेंटर येथील राजमुद्रा चौकात धम्म पहाटचे आयोजन केले होते. यावेळी देवाभाऊ वानखेडे, एस. के. जाधव, गायिका कमलाबाई वानखेडे, जितेंद्र भिसे, अर्षित गवई यांनी गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनकार्यावरील त्यागमय कार्यास आपल्या बुलंद आवाजातून उजाळा दिला. प्रारंभी महाबोधी महाविहारा मुक्त करा, अशी प्रतिज्ञा करण्यात आली तसेच भंते करुणानंद महाथेरो यांनी बुद्धवंदना घेतली. शाहीर वानखेडे यांनी शांतीदूताच्या वैभवशाली जाऊनीया आश्रमा, प्रथम नमू गौतमा चला हो प्रथम नमु गौतमा या बुद्ध गीताने या पहाटचा शुभारंभ केला. यानंतर बुद्धाचा जन्म झाला, गाऊनी पंचशील वंदू त्या गौतमाला तसेच माहेराला ती निघाली, सिद्धोदनाची राणी, आली ग बाई लिंबोच्या वणी तसेच पत्र वाचते रमाई हे हळूवार गीत ताकदीने सादर केले.
मुख्य बसस्थानक
मुख्य बसस्थानकांतील कर्मचाऱ्यांनी प्रथमच आगारात उत्साहात बुद्ध जयंती साजरी केली. प्रथम बुद्ध वंदना घेऊन येथे खीरदान व अन्नदान करण्यात आले. यावेळी अधिकार्यांसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आगारप्रमुख संगीता सूर्यवंशी, ललित शहा, संतोष नजन, बाबासाहेब साळुंखे मच्छिद्र बनकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमांसाठी शोभा खापर्डे, मनोज गडवे, बाबासाहेब वाहूळ, बाबासाहेब चाबुकस्वार, रवींद्र जाधव, नंदू वाघ व इतरांनी परिश्रम घेतले.
पदमपुऱ्यात भिक्खू संघाची रॅली
पदमपुरा येथील आम्रपाली महिला मंडळातर्फे बुद्ध जयंतीनिमित्त शनिवारी (दि.२) भिक्खू संघाला अन्नदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. भिक्खुणी धम्मदर्शना महाथेरी व भिक्खू ज्ञानरश्मी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी पदमपुरा परिसरातून भिक्खू संघाची रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमांसाठी आम्रपाली महिला मंडळाच्या हेमा बतुलै, निर्मला वाहुळकर, शीला शिरसाट, रमा गायकवाड, राधा जाधव, रुपा जाधव, पूजा भालेराव, कांता गायकवाड, प्रतिभा मगरे, माया जाधव व इतरांनी परिश्रम घेतले.
भारतीय दलित कोब्रा : शहरात ठिकठिकाणी खीरदान
भारतीय दलित कोब्रा संघटनेच्या वतीने अशोक बोर्ड यांच्या नेतृत्वाखाली रोकडिया हनुमान कॉलनी येथून सिद्धार्थ गार्डनपर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी युवा नेता आनंद बोर्डे, सागर बोर्डे, सुनिता चव्हाण, सुमित्रा खंडारे, नीलेश गायकवाड, रोहित शिंदे, आशा पवार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर सातारा देवळाई परिसरातील म्हाडा कॉलनी गांधीनगर यासह शहरात ठिकठिकाणी खीरदान करण्यात आले.