

Mahavir Jayanti Celebrated with Great Enthusiasm Under the Slogan "My City, My Responsibility"—Featuring a Spectacular Procession
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त सकल जैन समाजाच्या वतीने मंगळवारी (दि.३१) शहरात मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ढोल-ताशा आणि बॅण्ड पथकांच्या गजरात भगवान महावीर की जय, एक रुपया चांदी का, सारा देश महावीर का, जय बोलो महावीर.. अशा घोषणांनी वातावरण भक्तिमय झाले. यंदा माझे शहर माझी जबाबदारी या टॅगलाइनवर आधारित सजीव देखावे, त्यातून पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि एकतेचा दिलेला संदेश शहरवासीयांसाठी प्रेरणादायी ठरला.
महावीर चौक येथे भगवान महावीर स्तंभावर सकल जैन समाजाच्या वतीने सकाळी ७ वाजता धर्मध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पैठणगेट येथून जैन साधू-संतांच्या उपस्थितीत शोभायात्रेस प्रारंभ झाला. सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा, कार्याध्यक्ष सुभाष झांबड, पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, महापौर समीर राजुरकर, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, शिवसेना उबाठाचे नेते चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, प्रशांत देसरडा, सचिन खैरे, महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रतीक साहुजी, महासचिव महावीर पाटणी, सहसचिव डी. डी. वायकोस, नरेंद्र अजमेरा, पीयूष कासलीवाल, प्रशांत शहा आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या शेकडो महिला, पुरुष, युवक युवतींनी रथ, बैंड वाजा आणि ढोल-ताशांच्या गजरात जिओ और जिनो दो...चा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला. मनपा घनकचरा विभागही शोभायात्रेत सहभागी होत माझा कचरा माझी जबाबदारीचा जागर केला. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी थंड पेय, कुल्फी, पाणी, सरबताची व्यवस्था करण्यात आली होती. वर्धमान नागरी पतसंस्थेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ही शोभायोत्रा टिळकपथ, गुलमंडी, मछलीखडक, सिटी चौक, शहागंजमार्गे राजाबजार येथील जैन मंदिरात पोहोचल्यानंतर मोठ्या भक्तिभावाने भगवंताचा महामस्तकाभिषेक करण्यात आला.
झाकीयाँ, सजीव देखावे ठरले आकर्षण
शोभायात्रेतील झाकीयाँ, सजीव देखाव्यांच्या माध्यमातून पर्यावरण, स्वच्छता, एकतेचा संदेश देण्यात आला. हे सर्वच देखावे विशेष आकर्षण ठरले. भारतमातेचा आणि युद्ध नको शांती हवी, पाठशाळा आदींच्या देखाव्यातून सामाजिक संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी योगा व स्वर-क्षणाची प्रात्यक्षिके सादर केली.
विविध घोषवाक्य लिहिलेली फलके लक्षवेधी
नको बॅनरची भंपकवाजी, सुंदर शहर आपली जबाबदारी, गुड बाय प्लास्टिक, कचरामुक्त शहर, प्रगत आणि सुंदर शहर, गदंगी हटाओ-शहर बचाओ, झाडे लावा झाडे जगवा यांसह विविध घोषवाक्य लिहिलेले फलक लक्षवेधी ठरले. महिलांच्या हाती असलेल्या छत्यर्त्यांवरही झांडाच्या वेलींसह विविध सामाजिक संदेश लिहिण्यात आले होते.
रथा भगवंताच्या प्रतिमेसह इंद्र-इंद्राणी
रथयात्रेमध्ये शंखेश्श्वर पाश्वनाथ जैन मंदिर सिडको, गोडीजी पार्शवनाथ जैन मंदिर जोहरीवाडा, विमलनाथ जैन मंदिर जाधवमंडी यांच्या सजवलेल्या रथात इंद्र-इंद्राणी भगवंताच्या फोटोसह विराजमान होते. तसेच राजाबाजार जैन मंदिर, सराफा व हडको जैन मंदिर, सकल सैतवाल दिगंबर जैन समाज या मंदिराची पालखीसह शोभायात्रेत जैन समाज बांधव सहभागी होते.
वाळूज महानगरात जयंती उत्साहात
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : वाळूज महानगरात मंगळवारी (दि. ३१) भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकल जैन समाजबांधवांच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पंढरपूर येथील महावीर चौकापासून माजी जि.प. सदस्य अनिल चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान महावीरांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी जैन संस्कार युवा मंच, श्रीवर्धमान श्वेतांबर स्थानकवासी, श्रावक संघ आणि खंडेलवाल व सैतवाल दिगंबर पंचायतींच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले. शोभायात्रेचा समारोप बजाज नगरातील जैन स्थानकात झाला. यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात ५१ जणांनी रक्तदान केले, तर शालेय मुलांनी धार्मिक कार्यक्रम सादर केले.
बजाज नगरातील श्री १००८ संभवनाथ आणि श्री १००८ शांतिनाथ दिगंबर जैन मंदिरातही महाअभिषेक, पदयात्रा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवासाठी श्रावक संघाचे अध्यक्ष संतोष चोरडिया, सुजित गोधा, कुमार नवले, राजेंद्र अवतार यांच्यासह समाजबांधवांनी परिश्रम घेतले. महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.