Brother and sister die by drowning at Sillod
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : शेतात साचलेल्या पाण्यात बुडून सख्या बहीण-भावाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील मोढा बु. शिवारात गुरुवारी (दि. २६) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान रात्री उशिरापर्यंत या घटनेची सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद नव्हती.
हर्षदा गणेश कांबळे (६), रुद्र गणेश कांबळे (अडीच वर्षे, रा. मोढा बु.) असे पाण्यात बुडून मृत पावलेल्या बहीण-भावाचे नावे आहेत. मोढा बु. शिवारातील मुहुंवा डोंगरालगत असलेल्या गट नं. १७२ मध्ये गणेश कांबळे राहतात. बुधवारी रात्री मोढा परिसरात जोरदार पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यात बुडून चिमुकल्यांचा मृत्यू झाला.
सदर प्रकार लक्षात येताच नातेवाईक चिमुकल्यांचा मृतदेह घेऊन सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आले. मृत बहीण-भावाचे वडील गणेश कांबळे ऊसतोड कामगार असून, रोजामजुरी करून ते उदरनिर्वाह करतात. पाण्यात बुडून मुलगा व मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबाला मोठा आघात झाला आहे. तर पंचक्रोशीत या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.