Blood shortage in the district
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: दिवाळीच्या शाळा, महाविद्यालयांना सुट्या असल्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन घटले आहे. परिणामी, जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. घाटीसह शहरातील रक्त-पेढ्यांमध्ये रक्ताची टंचाई जाणवत आहे. तीन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी दात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरात शासकीय रक्तपेढीसह एकूण १४ रक्तपेढ्या आहेत. या रक्तपेढ्यांकडून महिन्याला सुमारे १० हजार रक्तपिशव्या संकलित होतात. तर रोज सहाशे ते सातशे रक्तपिशव्यांची गरज पडते. मात्र, सध्या दिवाळीच्या सुट्यांमुळे रक्ताची टंचाई जाणवत आहे. शाळा, महाविद्यालयांना सुट्या आहेत. तर शहरातील विविध सामाजिक संघटना, संस्था, पक्षांकडून रक्तदान शिबिराचे आयोजन कमी झाले आहे.
त्यामुळे शहरात रक्तदान शिबिरांचे आयोजन ७० ते ८० टक्क्यांपर्यंत घटले आहे. याचा परिणाम रक्तपेढ्यांवर दिसून येत असून, घाटीतील शासकीय रक्तपेढीसह इतर खासगी रक्तपेढ्यांवर रक्ताची मोठी टंचाई जाणवत आहे. अवध्या तीन ते चार दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा रक्तपेढ्यांमध्ये शिल्लक आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी रक्तपिशवी घेण्यासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तपेढ्यांतर्फे रक्तदान करण्याचे सांगितले जात आहे. रक्तदान शिबिरांना अत्यंत अल्पप्रतिसाद मिळत असल्याचे रक्तपेढ्यांकडून सांगण्यात आले.
रक्तदान करण्याचे आवाहन दिवाळीच्या सुट्यांमुळे रक्तदान शिबिरांचे आयोजन कमी झाले असून, रक्तदानही ५० ते ६० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे सगळीकडेच रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. नागरिकांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन आणि रक्तदान करावे.- डॉ. भारत सोनवणे, विभागप्रमुख, शासकीय रक्तपेढी, घाटी.
तीन दिवस पुरेल एवढाच साठा दरवर्षी दिवाळीत विधानसभा निवडणुका आल्याने सर्व संघटना, पश्नांचे कार्यकर्ते प्रचारात गुंतले आहे. त्यामुळे रक्तदान शिबिरांचे आयोजन जवळपास बंद झाल्याने रक्त संकलनही घटले आहे. दाता असेल तरच रक्त देतो. इतर रुग्णांना रक्त मिळत नसल्याने नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे.- शामराव सोनवणे, लायन्स रक्तपेढी.