BJP's divisional meeting Marathwada
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अगामी जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी भाजपला पोषक वातावरण आहे. त्यामुळे स्वबळाचा विचार व्हावा, अशी मागणी शुक्रवारी (दि.१०) भाजपच्या विभागीय बैठकीत मराठवाड्यातील अनेक तालुक्यांतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, - पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार अशोक चव्हाण, डॉ. भागवत कराड, माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थितीत होते. मराठवाड्यातील अगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आठही जिल्ह्यांतील भाजपच्या कामाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.
प्रत्येक जिल्ह्याला सुमारे ४५ ते ५० मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. पहिली बैठक धाराशिव जिल्ह्याची झाली. त्यानंतर लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना त्यानंतर सर्वात शेवटी छत्रपती संभाजीनगरची बैठक झाली. प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनाच बैठकीत प्रवेश होता. मंत्री सावे यांच्यासह माजी मंत्री डॉ. कराड, आमदार संजय केणेकर, आमदार प्रशांत बंब, आमदार अनुराधा चव्हाण, शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, सुहास शिरसाट, तालुका अध्यक्ष राधाकिसन पठाडे यांच्यासह सुमारे ६० ते ७० पदाधिकारीच उपस्थित होते.
राज्यात अगोदर नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुका होतील. यात तिन्ही निवडणुकामध्ये २०-२० दिवसांचा फरक राहणार आहे. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात तयारीला लागा. जेथे पक्षाची ताकद जास्त तेथे स्वबळाचा विचार करू, असे मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.