BJP's campaign rally in Murshidabadwadi receives an enthusiastic response
फुलंब्री, पुढारी वृत्तसेवा : गणोरी जिल्हा परिषद गटातील बिल्डा, संजुळ चिंचोली (बु.) व मुर्शिदाबादवाडी या गावांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रॅलीत मागील काळात झालेल्या विकासकामांवर जोर देण्यात आला.
राज्यस्थान राज्यपाल तथा तत्कालीन आमदार हरिभाऊ बागडे आणि आमदार अनुराधा चव्हाण यांच्या कार्यकाळात या परिसरात रस्ते, सिंचन, सामाजिक सभागृह, नदी खोलीकरण व रुंदीकरण तसेच महिला सबलीकरणाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लावण्यात आली. अनेक वर्षांपासून रखडलेले अंतर्गत गाव रस्ते व शेतरस्ते सिमेंट काँक्रीटचे झाल्याने दळणवळण अधिक सुलभ झाले आहे.
पूर्वी पावसाळ्यात अडचणी निर्माण करणारे रस्ते आता वर्षभर वापरात येत असल्याने शेतमालाची वाहतूक सोपी झाली आहे. शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या विविध सिंचन योजनांमुळे पाणीटंचाईवर मोठ्या प्रमाणात मात करण्यात आली आहे. नदी खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामांमुळे पाणीसाठ्यात वाढ झाली असून, विहिरी व बोअरवेल्सच्या पाणीपातळीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. यासोबतच गाळ काढण्याच्या अभियानामुळे शेतजमिनी अधिक सुपीक झाल्या असून, शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली आहे. गावागावात उभारण्यात आलेली सामाजिक सभागृहे ही केवळ इमारती न राहता, सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक उपक्रमांचे केंद्र बनली आहेत.
महिला सबलीकरण अंतर्गत बचत गटांना प्रोत्साहन, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याने महिलांचा आत्मविश्वास वाढला असून, त्यांचा सामाजिक सहभागही वाढला असल्याचे रॅलीत सांगण्यात आले.
निवडणुकीत विकासकामांची चर्चा
ठोस विकासकामांचा वारसा पुढे नेण्यासाठी भाजपचे गणोरी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार निखिल चव्हाण व गणोरी पंचायत समिती गणांचे उमेदवार बाळासाहेब तांदळे यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. प्रचार रॅलीदरम्यान अनेक नागरिकांनी स्वतःहून सहभाग घेत काम केलेल्यांनाच पुन्हा संधी अशी स्पष्ट भूमिका व्यक्त केली. एकूणच, गणोरी जिल्हा परिषद गटात मागील काळात राबविण्यात आलेल्या रस्ते, सिंचन, नदी खोलीकरण, गाळ काढणे व महिला सबलीकरणाच्या ठोस विकासकामांमुळे भाजप उमेदवारांभोवती विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, ही निवडणूक विकासाच्या मुद्द्द्यावरच निर्णायक ठरण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसून येत आहेत.