BJP-Shiv Sena contest for ZP president post
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील राजकीय रस्सीखेच अद्याप कायम असल्याचे चित्र दिसत आहे. अध्यक्ष निवडीची प्रक्रिया अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असली तरीही दोन्ही पक्षांमध्ये अधिकृत युतीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेबाबत राजकीय हालचालींना वेग आला आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप २३ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला, तर शिवसेनेने २१ जागांवर विजय मिळवत दुसरे स्थान मिळवले आहे. दोन्ही पक्षांमधील जागांचा फरक अत्यल्प असल्याने अध्यक्षपदासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
त्यामुळे राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची बनली आहेत. विशेषतः गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा पक्ष असूनही सत्तेपासून दूर राहावे लागले होते. त्या पार्श्वभूमीवर यावेळी कोणतीही राजकीय गडबड होऊ नये यासाठी भाजपकडून सावध पावले उचलली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होण्याबाबत जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. अध्यक्षपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा कार्यकाळ ठेवण्याच्या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांमध्ये प्राथमिक सहमती झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र पहिल्या अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद कोणत्या पक्षाकडे राहणार, यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे अध्यक्षपदासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदासंदर्भात भाजप आणि शिवसेनेमधील युतीबाबतचा अंतिम निर्णय सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. त्यानंतरच अध्यक्षपदाबाबत पुढील भूमिका स्पष्ट होईल.अतुल सावे, मंत्री तथा भाजपचे नेते
युतीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. कालपासून युतीबाबत विविध अफवा पसरवल्या जात आहेत. अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे घेतील.- रमेश पवार, जिल्हाप्रमुख