

Case Registered Over Bogus Ration Card Issued in Deputy Chief Minister Shinde's Name
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बोगस रेशनकार्ड (शिधापत्रिका) तयार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार शुक्रवारी (दि.१३) अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय येथे घडला. अन्नधान्य वितरण अधिकारी भारती वाकोडे यांच्या तक्रारीनुसार, माजी खासदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी (दि.१२) घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड माध्यमांना दाखवले होते.
या कार्डवर एकनाथ संभाजी शिंदे (रा. आंबेडकरनगर, औरंगाबाद) असे नाव असून, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावेही नमूद करण्यात आली होती. या कार्डवर कार्यालयाचे बनावट गोल शिक्के आणि सक्षम अधिकाऱ्याची खोटी स्वाक्षरी असल्याचे दिसून आली.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत प्रशासनाने तात्काळ तपासणी सुरू केली. रेशन कार्डवर नमूद असलेल्या आधार कार्ड क्रमांकानुसार ऑनलाईन प्रणालीमध्ये तपासणी केली असता, असे कोणतेही रेशन कार्ड अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच, आंबेडकरनगर परिसरातील संबंधित ड रजिस्टर (दप्तर) मध्येही या कार्डची कोणतीही नोंद आढळून आली नाही.
शासनाच्या विविध योजनांचा लाभघेण्याच्या उद्देशाने वापर केला. अधिक तपास दुय्यम पोलिस निरीक्षक रोयलावार करत आहेत.