छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघावर भाजपचा दावा pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Political News : छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघावर भाजपचा दावा

शहराध्यक्ष शितोळे यांचे प्रदेशाध्यक्षांना पत्र, निवडणुकीपूर्वी वाद चिघळणार

पुढारी वृत्तसेवा

BJP Lays Claim to Chhatrapati Sambhajinagar-Jalna Constituency

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक भाजपचेच निवडून आले आहेत. त्यामुळे औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ हा भाजपकडे घ्यावा, असे पत्र शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पाठविले आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या या मतदारसंघावर भाजपकडून दावा केला जात असल्याने पुन्हा एकदा दोन्ही मित्र पक्षात वाद चिघळण्याची शक्यता आहे.

शिवसेना-भाजपच्या युतीवेळीच दोन्ही पक्षांकडून जागा वाटपाचा फार्म्युला निश्चित करण्यात आला होता. परंतु, मागील सहा वर्षांतील राजकीय उलथापालथीमध्ये शिवसेनेचे विभाजन होऊन शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) निर्माण झाले आहेत. त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबतचा फार्म्युलाही आता इतिहासजमा झाला आहे.

तसेच जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्याच्या विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिव सेनेपेक्षा भाजप सर्वाधिक जागांवर विजय मिळवत पहिल्या क्रमांकावर आहे. या ताकदीच्या जोरावरच आता भाजपने शिंदे सेनेकडे असलेल्या मतदारसंघांवर दावा करण्यास सुरुवात केली आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागातील औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची नुकतीच घोषणा झाली आहे. या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या नगरसेवक, सदस्यांनाच मतदानाचा अधिकार असतो. सुमारे ६०० मतदारसंघ असून, त्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन्ही जिल्ह्यात भाजपचेच सर्वाधिक मतदार असल्याने भाजप शहर जिल्हाध्यक्ष शितोळे यांनी हा मतदारसंघ भाजपसाठी सोडून घ्यावा, अशी मागणी प्रदे-शाध्यक्ष चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे या मागणीवरून आता दोन्ही मित्र पक्षात पुन्हा एकदा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

सेनेपेक्षा भाजपचे मतदार अधिक छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वाधिक ठिकाणी भाजपचे बहुमत आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघातील मतदार संख्याही भाजपकडेच अधिक आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांकडे पत्राद्वारे मतदारसंघ सोडून घेण्याची मागणी केली आहे.
- किशोर शितोळे, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप
मतदारसंघ शिवसेनेचाच छत्रपती संभाजीनगर -जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ हा अगोदरपासून शिवसेनेकडेच आहे. त्यामुळे राज्यातील १६ जागांचे वाटप कसे करायचे, याबाबत निर्णय घेण्याचा सर्व अधिकार हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आहे.
राजेंद्र जंजाळ, जिल्हाप्रमुख, शिवसेना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT