छत्रपती संभाजीनगर : महायुतीतील जागा वाटपानुसार छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ हा शिवसेनेकडे आहे. परंतु नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर दोन्ही जिल्ह्यांतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे शिंदे सेनेने आता मतदारसंख्येचा विचार करून ही जागा भाजपला सोडावी, अशी भूमिका गुरुवारी (दि. २८) भाजपच्या विभागीय कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह बसवराज मंगरुळे यांनी स्पष्ट केली. तसेच भाजपने या निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी केली असल्याचाही इशारा त्यांनी दिला.
छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ आता भाजपसाठी प्रतिष्ठेचा बनला आहे. हा मतदारसंघ यंदा भाजपलाच मिळावा यासाठी पक्षाचे सर्वच नेते आता अक्रमक झाले आहेत. गुरुवारी याबाबत भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे व बसवराज मंगरुळे या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेत मतदारसंघाबाबत भूमिका मांडली.
शितोळे म्हणाले की, या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यांतील स्थिती ही पूर्णतः भाजपच्या बाजूने आहे. नगरपरिषदेत काही जागा कमी असल्या तरी जिल्हा परिषद, महापालिका आणि पंचायत समितीमध्ये पहिल्या क्रमांकावरच आहोत. त्यामुळे या निवडणुकीतील सर्वाधिक मतदार भाजपकडेच आहे, असा दावाही शितोळे यांनी केला आहे.
दरम्यान, या मतदारसंघावर दावा करण्यापूर्वी शिंदे सेनेच्या स्थानिकांनी दोन्ही जिल्ह्यांत त्यांच्याकडे असलेल्या मतदारांच्या संख्याबळाचा विचार करावा, असा सल्ला भाजपचे पदाधिकारी बसवराज मंगरुळे यांनी दिला आहे. भाजपकडे ६०० मतांपैकी सुमारे २७० हून अधिक मतदान उपलब्ध आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांचा विचार केल्यास भाजपाचा उमेदवार सहज विजयी होईल.
एवढेच नव्हे तर भाजपने स्वबळावर ही निवडणूक लढली तरी त्यात भाजपचाच विजय निश्चित असल्याचे मंगरुळे म्हणाले. त्यामुळे आता भाजपचे स्थानिक पदाधिकाऱ्यांसह इच्छुक संभाजीनगर-जालना मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी आक्रमक झाले आहेत.
आमचा पक्षश्रेष्ठींवर विश्वास- भाजप शिस्त आणि पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करणारा पक्ष आहे. 66 प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ते त्यानुसारच कामकाज करतात. त्यामुळे संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेबाबत भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधता येत असतानाही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन का भूमिका मांडली, हेच एक कोडे असून, आमचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे.उपमहापौर तथा जिल्हाध्यक्ष, शिवसेना -राजेंद्र जंजाळ