BJP Corporators Demolish Their Own Unauthorized Structures; Sparks Off Political Speculation
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिकेने केलेल्या धडक कारवाईचे पडसाद आता सत्ताधारी भाजपमध्ये उमटताना दिसत आहेत. भाजपचे नगरसेवक गणेश नावंदर आणि विश्वनाथ स्वामी यांच्या कथित अनधिकृत बांधकामांविरोधात तक्रारी पुढे आल्यानंतर दोघांनीही रविवारी (दि.१७) स्वतःहून बांधकामातील काही भाग हटविण्यास सुरुवात केली असून महापालिकेने या दोघांना नोटीस बजावली. यावर मनपाकडून नोटीस प्राप्त झाल्याचे नावंदर यांनी सांगितले. तर मला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचा दावा स्वामी यांनी केला आहे. या नाट्यमय घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात चचांना उधाण आले आहे.
महानगरपालिका प्रभाग क्र. १० (क) मधून निवडून आलेले भाजप नगरसेवक गणेश नावंदर आणि प्रभाग क्र. ११ (अ) मधील नगरसेवक विश्वनाथ स्वामी या दोन्ही नगरसेवकांनी सिडकोकडून प्लॉट घेतलेला आहे. या प्लॉटवर मनपाची परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम केल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झालेल्या आहेत.
दरम्यान नगरसेवक गणेश नावंदर यांच्या मालकीचे एन-५, एफ सेक्टर प्लॉट नंबर १, १ ए येथील शॉपलेट प्लॉटवर तीन मजली इमारत अनधिकृत व काही भाग नाल्यावर अतिक्रमण करून बांधण्यात आलेला आहे. तसेच नगरसेवक विश्वनाथ स्वामी यांनी सिडको एन-५ मधील टपरीसाठी असलेल्या प्लॉट-१ आणि १ (ए) यावर सामासिक अंतरात बांधकाम करून दोन मजली अनधिकृत बांधकाम केले. असा अहवाल झोन कार्यालयाच्या सहायक आयुक्तांनी दिला. त्यामुळे गणेश नावंदर, विश्वनाथ स्वामी यांच्या नगरसेवकपदाला धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपानंतर एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या अतिक्रमण असलेल्या दोन घरांसह संपर्क कार्यालयावर महापालिकेने नुकतीच बुलडोझर कारवाई केली होती. या कारवाईनंतर एमआयएमने निवडक कारवाईचा आरोप करत थेट भाजप नगरसेवकांच्या बांधकामांकडे बोट दाखविले. त्यानंतर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तीयाज जलील यांनी महापालिका आयुक्त अमोल येडगे यांची भेट घेत भाजप नगरसेवक विश्वनाथ स्वामी व गणेश नावंदर यांच्या कथित अतिक्रमणाविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली होती.
तसेच ठाकरे सेनेचे रवींद्र तांगडे यांनीही यापूर्वीच याप्रकरणी महापालिकेकडे लेखी तक्रार देत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. या तक्रारीची दखल घेत मनपाच्या झोन कार्यालयाने तीन दिवसांपूर्वीच या दोन्ही नगरसेवकांना नोटीस बजावली. या नोटीसीचा धसका घेत नगरसेवक गणेश नावंदर आणि विश्वनाथ स्वामी यांनी स्वतःहून अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केली आहे.
या घडामोडींमुळे कारवाई होण्यापूर्वीच नगरसेवकांनी माघार घेतली अशी चर्चा मनपा वर्तुळात रंगली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून शहरातील विविध भागांतील अतिक्रमणांच्या तक्रारींची छाननी सुरू असून, संबंधितांना नोटिसा देण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांना स्वतःहून बांधकाम हटवावे लागल्याची चर्चा आहे. एमआयएमचे नगरसेवक मतीन यांच्यानंतर भाजप नगरसेवकांच्या अतिक्रमणाच्या तक्रारी आल्या, त्याची चौकशी करून, अनधिकृत असेल तर ते पाडले जाईल, असे महापौर समीर राजूरकर, सभापती अनिल मकरिये, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले होते.
मात्र या घडामोडींमुळे नियम सर्वांसाठी समान हा संसदेश प्रशासनाकडून देण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अतिक्रमणाच्या मुद्द्द्यावर आता राजकीय दबावापेक्षा प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत
वरिष्ठांच्या सूचनेनुसार काढले अतिक्रमण माझ्या इमारत बांधकामाची निवडणूक होताच मनपाकडे तक्रार करण्यात आली होती. माझ्याकडे जी प्लस २ बांधकामाची परवानगी असून संपूर्ण बांधकाम अनधिकृत नाही. मी नाल्यावर बांधकाम केलेले नाही. माझ्या घरालगत नाली असून, त्याबाजूने ३ फूट बाय १.५ फूटाची गॅलरी काढली होती. यासह समोरील गॅलरीत भिंत बांधली होती, तक्रारीनंतर पक्षश्रेष्ठींनी मला अतिक्रमित बांधकाम काढून घेण्यास सांगितले. आज ते मी काढून घेण्यास सुरुवात केली आहे.- गणेश नावंदर, नगरसेवक.
मला कोणतीही नोटीस मिळालेली नाही : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अथवा संबंधित झोन कार्यालयातून मला कोणतीही नोटीस प्राप्त झालेली नाही. माझ्या इमारतीसाठी आवश्यक सर्व परवानग्या घेतलेल्या आहेत. सन २०१८ मध्ये पहिल्या मजल्यासाठी सिडकोची एनओसी मिळाली होती. तसेच बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्रही माझ्याकडे आहे. यावर्षी सिडकोची एनओसी पुन्हा नूतनीकरण करण्यात आली आहे. त्यामुळे हे अतिक्रमण असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सध्या सुरू असलेले काम हे केवळ दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे आहे.विश्वनाथ स्वामी, नगरसेवक