Plantation Scam : झाडांच्या तपासणीविनाच २.५० कोटींचे बिल अदा file photo
छत्रपती संभाजीनगर

Plantation Scam : झाडांच्या तपासणीविनाच २.५० कोटींचे बिल अदा

पीडब्ल्यूडीचा वृक्षारोपण घोटाळा, जिओ टॅगिंगचा घेतला आधार

पुढारी वृत्तसेवा

Bill of ₹2.50 crore paid without tree inspection

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने २०२४ मध्ये शासन आदेशानुसार विविध महामार्गाच्या कडेला उद्दिष्टाप्रमाणे झाडे लावल्याचा दावा केला आहे. परंतु प्रत्यक्षात किती झाडे लावली व त्यापैकी किती जगली, याबाबत प्रत्यक्ष पाहणी अथवा तपासणी न करताच केवळ जिओ टॅगिंगचा आधार घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदार तेजस एजन्सीला पहिल्या टप्प्यातील २ कोटी ५० लाख रुपयांपर्यंतचे बिल अदा केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने शासन अभियान राबविले. परंतु या कामासाठी काढण्यात आलेल्या निविदेपासून ते एजन्सी निश्चित करणे आणि कार्यारंभ आदेश देण्याची प्रकिया आणि वृक्षारोपण, या सर्वच कामात प्रचंड प्रमाणात अनियमितता झाली आहे. जिल्ह्यात दोन कार्यकारी अभियंता विभागांकडून या कामासाठी २०२४ मध्ये प्रत्येकी ६-६ कोटी रुपयांची निविदा राबविण्यात आली होती. यात एकाच कंत्राटदाराला दोन्ही विभागांनी अंतिम केले. तेजस सुपर स्ट्रक्चर प्रा.लि. असे एजन्सीचे नाव आहे. निविदेतील अटी-शर्तीनुसार वृक्षारोपण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने तीन वर्षे कंत्राटदाराला कामाची देयके अदा करणे आवश्यक होते.

पहिल्या टप्प्यात वृक्षारोपण झाल्यानंतर केलेल्या जिओ टॅगिंगनुसार वृक्षारोपणाचे काम झाले की नाही, हे अगोदर अभियंत्यांनी तपासणे आवश्यक होते. परंतु तसे न करताच सार्वजनिक बांधकाम विभागाने पहिल्या टप्प्यातील देयके अदा केली आहेत. ही देयके अदा करताना जिओ टॅगिंगचा आधार घेण्यात आल्याचे अभियंत्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे जनतेच्या पैशाची प्रशासन बेफिकरीने उधळपट्टी करते, हेच यातून दिसून येत आहे. प्रत्यक्षात तेजस एजन्सीने दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे वृक्षारोपण केलेले नाही. जेथे ५०० ते ६०० झाडे लावण्याचे टार्गेट देण्यात आले होते, तेथे प्रत्यक्षात केवळ २०० ते सव्वादोनशेच झाडे लावण्यात आली आहेत. तसेच त्यातील सुमारे ९० ते ८५ टक्के झाडे पाण्याअभावी वाळून गेली. त्या ठिकाणी अद्यापही नवी झाडे लावण्यात आलेली नाहीत. तरीही एका विभागाकडून १ कोटी ५० लाखांचे, तर दुसऱ्या विभागाकडून १ कोटीचे देयक अदा करण्यात आले आहे.

थेट सवाल

गतवर्षी १२ कोटींची झाडे कुठे लावली?

जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांलगत दुतर्फा, त्यासोबतच शासकीय कार्यालयांच्या परिसरात लावली.

प्रश्न : कोणत्या रस्त्यावर कोठून कुठपर्यंत लावली ?

उत्तर : शासकीय विश्रामगृह परिसर, फर्दापूर रस्ता,

फुलंब्री रस्ता, पैठण रस्त्यावर.

प्रश्न : वृक्षारोपण केलेल्या झाडांचे फोटो काढले आहेत का?

उत्तर: फोटो काढण्याची आवश्यकता नाही. सर्व झाडांचे जिओ टॅगिंग केले आहे.

प्रश्न : किती झाडे जगली अन् किती जळाली?

उत्तर : जिल्ह्यात किमान ७० ते ८० टक्के झाडे जगली,

३० ते २० टक्के जळाली.

प्रश्न : जळालेल्या झाडांच्या ठिकाणी नव्याने झाडे लावली का?

उत्तर : लावली असतील, त्याशिवाय बिल अदा करता येत नाही.

प्रश्न : आतापर्यंत कंत्राटदाराला किती देयके अदा केली?

उत्तर : जेवढे झाडे लावण्यात आली, त्याची बिले अदा

केली. सुमारे दीड कोटी पहिला हप्ता दिला. प्रश्न : जळालेली झाडे लावलीच नसेल तर बिल

कोणत्या अधारे दिले?

उत्तर : पुढील ३ वर्षांपर्यंत काम आहे, त्याला झाडे लावावीच लागेल.

प्रश्न : दोन वर्षांपूर्वीच्या वृक्षारोपणाचेच उद्दिष्ट पूर्ण झाले नसताना नव्याने निविदा का?

उत्तर : शासनाचे आदेश असल्यामुळे पुन्हा ६ कोटींच्या वृक्षरोपणासाठी निविदा राबविली आहे.

जिओ टॅगिंगद्वारे बिल अदा गतवर्षी जिल्ह्यात कंत्राटदाराने वृक्षारोपण केले आहे. हे काम तीन वर्षांचे असून, त्यात टप्प्याटप्प्याने देयके अदा करायची आहेत. जेवढी झाडे लावली, त्याची बिले जिओ टॅगिंगचा आधार घेत अदा केली आहेत. त्यासाठी फोटो पाहण्याची आवश्यकता पडली नाही. सुमारे ६ कोटींपैकी दीड कोटी रुपये अदा केले आहेत.
- शेषराव चव्हाण, कार्यकारी अभियंता, पीडब्ल्यूडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT