वाळूज, पुढारी वृत्तसेवा: दिवाळीनिमित्त कामगार कुटुंबासह गावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी नायगाव येथील बकवालनगरमध्ये एकाच रात्री पाच बंद घरे फोडली. शुक्रवारी (दि. १३) मध्यरात्री घडलेल्या या घटनेत चोरट्यांनी घरातील साहित्याची उचकापाचक केली. मात्र, एक लाख रुपयांची रोकड आणि चांदीचे दागिने सुरक्षित राहिले. घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
बकवालनगरमधील गल्ली क्रमांक दोनमध्ये बशीर शेख यांच्या खोल्यांत शैलेश प्रभुने, नीलेश प्रभुने (रा. खामगाव, जि. बुलढाणा) आणि राहुल लोखंडे हे कामगार भाड्याने राहतात. दिवाळीसाठी ते घरांना कुलूप लावून गावी गेले होते.
ही संधी साधून चोरट्यांनी प्रथम शेजारील घरांच्या बाहेरून कड्या लावल्या. त्यानंतर बंद घरांचे कुलूप तोडून कपाटे व साहित्याची उचकापाचक केली. शैलेश प्रभुने यांनी वाहन विक्रीतून मिळालेले एक लाख रुपये कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवले होते. मात्र, चोरट्यांना ही रोकड सापडली नाही. चांदीचे दागिनेही सुरक्षित राहिले. रवि बकवाल यांच्या खोल्यांतील अन्य दोन भाडेकरूंची घरेही फोडण्यात आली.
रात्री दीड ते अडीचदरम्यान हा प्रकार घडल्याचा अंदाज आहे. उपनिरीक्षक जोगस यांनी पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, पोलिस ठाण्यात अद्याप गुन्ह्याची नोंद नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
कामगार वसाहतीत गस्त वाढविण्याची मागणी
बकवालनगरमध्ये विविध कंपन्यांतील मोठ्या संख्येने कामगार राहतात. त्यांच्या वेगवेगळ्या पाळ्यांमुळे परिसरात वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेनेचे तालुकाधिकारी रमेश आरगडे यांनी केली.