As soon as the supply of LPG gas resumed, queues of rickshaws formed
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
जागतिक घडामोडींचा फटका इंधन पुरवठ्यावर झाला असून, गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यातील कोरडेठाक पडलेल्या पंपांपैकी केवळ तीन पंपांवर सोमवारी (दि.२३) गॅस उपलब्ध झाल्याने रिक्षाचालकांनी एकच गर्दी केली. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे रिक्षांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत.
युद्ध सुरू होताच पंपावर एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत होता. तो वाढत जाऊन जिल्ह्यातील सुमारे १८ पंप कोरडे पडले होते. दरम्यान सोमवारी क्रांती चौका, बीडबायपास आणि चिकलठाणा येथील पंपावर गॅस पुरवठा झाला.
याची माहिती मिळताच रिक्षाचालकांनी गॅस भरण्यासाठी एकच गर्दी केली. एलपीजी गॅसवर चालणारे रिक्षा गेल्या चार ते पाच दिवसांपासून पेट्रोलवर चालवण्यास भाग पडले होते. गॅस उपलब्ध झाल्याची माहिती मिळताच त्यांनी जवळच्या गॅस पंपांवर धाव घेतली. यामुळे सर्वच पंपांवर रिक्षांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गॅस पुरवठा सायंकाळी ७ च्या सुमारास उपलब्ध झाल्याने गॅस मिळवण्यासाठी रिक्षाचालकांनी रात्री उशिरापर्यंत थांबवण्याची तयारी ठेवली आहे.
२५ हजार रिक्षा : जिल्ह्यात एकूण ३२ हजार रिक्षा असून, त्यापैकी सुमारे २५ हजारांहून अधिक रिक्षा या केवळ एलपीजी इंधनावर चालतात. सीएनजी आणि पेट्रोलवर चालणाऱ्या रिक्षांची संख्या तुलनेने कमी आहे. इंधनाचे दर गगनाला भिडल्यामुळे तसेच गॅसचा तुटवडा झाल्याने अनेकांनी नाविलाजास्तव पेट्रोलवर काही दिवस व्यवसाय केला. परंतु ते परवडत नसल्याने अनेकांनी रिक्षा थांबवून ठेवल्या होत्या. अद्यापही जिल्ह्यातील १५ पंप गॅसच्या प्रतीक्षेत आहेत.