

Citizens suffer due to gas shortage in Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर शहरात गॅसचा काळाबाजार अन् सर्वसामान्यांचे हाल सुरू असून, या स्थितीचा गैरफायदा घेत ग्राहकांची उघडपणे लुबाडणूक केली जात आहे. वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत, कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील तब्बल ७४ गॅस एजन्सींची महाझाडाझडती सुरू करण्यात आली आहे.
एकीकडे घरगुती गॅससाठी १० दिवसांची वेटिंग असल्याने ग्राहकांचा संताप अनावर झाला आहे, तर दुसरीकडे वाळूज महानगरात कामगारांना भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे. दरम्यान, गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी आता दोन बुकिंगमधील अंतर १५ दिवसांवरून २५ दिवसांवर करण्यात आले आहे.
दुसरीकडे, एलपीजी गॅसचे दर चक्क ८९ रुपयांवर पोहोचल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेल्या हजारो रिक्षाचालकांनी थेट भाडेवाढीचा इशारा देत प्रशासनाला कोंडीत पकडले आहे. काळाबाजार रोखण्यासाठी गोदामांवर धाडी; प्रशासनाची धडक मोहीम जिल्ह्यात गॅसचा मुबलक साठा उपलब्ध असूनही काही गॅस पुरवठाधारक आणि एजन्सी चालक या आपत्कालीन परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत. घरगुती गॅसची व्यावसायिक कारणांसाठी काळ्या बाजारात विक्री होत असल्याच्या तक्रारीनंतर प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे.
वाळूजमध्ये कामगारांची उन्हात होरपळ; एजन्सी कर्मचाऱ्यांचे फोन बंद वाळूज महानगरातील कामगार वर्गाला गॅस टंचाईचा सर्वाधिक फटका बसत आहे. बजाजनगर, वडगाव आणि सिडको वाळूज महानगर परिसरातील एका गॅस एजन्सीचे स्वतःचे गोदाम नसल्याने, हायटेक कॉलेजसमोरील मोकळ्या मैदानावर ग्राहकांना सिलिंडर वितरित केले जातात.
गेल्या तीन-चार दिवसांपासून सिलिंडरची गाडी कधी येईल याचा काहीच नेम नसल्याने कामगार सकाळपासूनच रिकामे सिलिंडर घेऊन भर उन्हात मैदानावर ताटकळत बसलेले असतात. विशेष म्हणजे एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी आपले मोबाईल फोन बंद ठेवल्याने ग्राहकांचा संपर्क होऊ शकत नाहीये.
रेकॉर्डची तपासणी
या पथकांकडून गुरुवारी दिवसभर अनेक गोदामांना अचानक भेटी देऊन उपलब्ध साठा, ग्राहकांची मागणी आणि प्रत्यक्ष वितरण याची कसून तपासणी करण्यात आली. साठेबाजी किंवा काळाबाजार करताना आढळणाऱ्या एजन्सींवर थेट गुन्हे दाखल करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
पथके रवाना
जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी गुरुवारी (दि. १२) सकाळीच विशेष तपासणी पथकांची स्थापना करून त्यांना तातडीचे आदेश दिले.
एलपीजीचा भडका ! रिक्षाचालक हवालदिल
दरांचा आलेख अवध्या दोन दिवसांपूर्वी ८०.९५ रुपये प्रति लिटर असलेला एलपीजी गॅस गुरुवारी (दि. १२) थेट ८८.९५ रुपये प्रति लिटरवर जाऊन पोहोचला आहे.
भाडेवाढीची मागणी इंधनाचे दर डोईजड
झाल्याने रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती महासंघाचे अध्यक्ष निसार अहमद खान यांनी पहिल्या दीड किलोमीटरसाठी २६ ऐवजी २८ रुपये व पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १८ ऐवजी २० रुपये भाडे करण्याची अधिकृत मागणी केली आहे. दरवाढ न मिळाल्यास रिक्षा व्यवसाय ठप्प करण्याचा इशारा देण्यात आला आहे.