Approvals Granted to Housing Projects Just Ahead of the Financial Year-End
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरातील काही गृहप्रकल्पांसह विविध बांधकामांच्या संचिका मार्चएण्डच्या तोंडावर मंजूर करण्यात आल्या. त्यासाठी शनिवारी सुटीच्या दिवशी आयुक्त जी. श्रीकांत यांनी नगररचना विभागात दोन तास तळ ठोकून सुमारे २५ हून अधिक संचिका निकाली काढल्या आहेत.
महापालिकेसाठी मालमत्ता कर, पाणीपट्टी पाठोपाठ नगर रचना विभागाकडून मिळणारे उत्पन्न महत्त्वाचा स्त्रोत आहे. नगर रचना विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र तसेच गुंठेवारीअंतर्गत गेल्या काही वर्षांत विक्रमी उत्पन्न मिळत आहे.
राज्य शासनाने बांधकाम परवानगी ऑनलाइन केली आहे. तसेच काही ठरावीक क्षेत्रफळापर्यंतच्या बांधकामांना परवानगी देण्याचे अधिकार हे नगररचना विभागाचे सहायक संचालक यांच्याकडे असतात. तर मोठ्या क्षेत्रफळाच्या बांधकामांना आयुक्तांचीच परवानगी आवश्यक असते. यात विशेष इमारती, मोठे ले-आऊट, मेगा ग्रुप हाऊसिंग यासह मोठ्या क्षेत्रफळाच्या फायलींचा समावेश आहे.
दरम्यान, दरवर्षी मार्चएण्डच्या तोंडावर काही रखडलेल्या संचिका निकाली काढल्या जात असतात. यंदाही आर्थिक वर्षे संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असल्याने काही मोठ्या बांधकामांच्या संचिका अंतिम करण्यात आल्या. शनिवारी सुटीच्या दिवशी मालमत्ता कर भरणा करण्याचे काम सुरू ठेवण्याचे आदेश अगोदरच आयुक्तांनी सर्व झोन कार्यालयांना दिले होते.
यात नगरसचना विभागालाही कामावर येण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यांनी दोन तासात २५ संचिका निकाली काढल्या. यावेळी उपसंचालक मनोज गर्जे, उपनगररचनाकार कौस्तुभ भावे यांच्यासह नगररचना विभागातील उपअभियंताही उपस्थित होते. या बांधकाम परवानगीतून महापालिकेच्या तिजोरीत सात कोटी रुपयांचे उत्पन्न जमा होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यासाठीच सोमवारऐवजी शनिवारी प्रशासनाकडून घाईत परवानगी देण्यात आल्या.