Anger erupts over Transformer, former sarpanch attempts self-immolation
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : पिंपळवाडी येथील शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांच्या तक्रारींकडे महावितरणकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शुक्रवारी (दि.१४) संतापाच्या स्फोटास कारणीभूत ठरला. रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत डीपीमुळे वाहतूक आणि शेतीकामांमध्ये होणाऱ्या अडथळ्यांमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरण ग्रामीण शाखा क्र.१ कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करत माजी सरपंच दिलीप शिंदे यांच्यासह काहींनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.
सहाय्यक अभियंत्यांच्या उडवाउडवीमुळे चिघळली परिस्थिती गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी डीपी स्थलांतरणाची मागणी करीत होते. ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर, ट्रक, जड वाहने विद्युत तारांच्या खालून जाताना अडकण्याच्या घटना वारंवार घडत असून गंभीर अपघाताचा धोका कायम आहे. परिणामी ऊस वाहतूक पूर्णपणे ठप्प अवस्थेत आहे. शुक्रवारी महावितरण कार्यालयात झालेल्या बैठकीत सहाय्यक अभियंता ईश्वर तावरे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
त्यावरून संतापाची ठिणगी पडली क्षणात वातावरण आणि तापले. संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने शिस्तभंगात्मक कारवाई करावीविद्युत डीपीचे त्वरित स्थलांतरण करावे या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. पोलिस आणि महावितरण अधिकारी घटनास्थळी धावपळ करून तणाव कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या घटने मुळे महावितरण विभागाची धांदल उडाली आहे, तर गावातील शेतकरी ङ्गङ्घ आमच्या जीवाशी खेळ नकोफ्फ़ असा आक्रोश करीत आहेत. अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या समस्येकडे आता तरी गंभीरपणे पाहून तातडीने निर्णय घ्यावा, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.
आत्मदहनामुळे प्रशासन धास्तावले
अचानक पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न होताच महावितरण कर्मचाऱ्यांनी आणि उपस्थित नागरिकांनी शेतकऱ्यांना थांबवून परिस्थिती तातडीने नियंत्रणात आणली. तरीही या घटनेने महावितरण प्रशासन हादरले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपूर्ण अहवाल पाठविण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचा निषेध कायम राहिल्यास पिंपळवाडीतील परिस्थिती आगामी काळात आणखीन गंभीर होऊ शकते, अशी भीती ग्रामस्थांत व्यक्त होत आहे.